मुंबई

नवी मुंबईतील 'हा' आयकॉनिक प्रकल्प एकदा पाहाच! बच्चे कंपनीला गिफ्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवी मुंबईत (Navi Mumbai) भव्य विज्ञान केंद्र (Science Center) साकारले जात आहे. नवी मुंबई महापालिका (NMMC) त्यासाठी १०९ कोटींचा खर्च करत आहे. मे. पायोनिर फाऊंडेशन इंजिनिअर्स प्रा.लि. या कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत हे विज्ञान केंद्र पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई, बंगळूर व पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच नवी मुंबईतही एक विज्ञान केंद्र उभे राहणार आहे.

महापालिकेने नेरुळ सेक्टर १९ अ वंडर्स पार्कच्या लगतच दहा हेक्टर भूखंडापैकी २ हेक्टरचा भूखंड वेगळा केला आहे. येथील संपूर्ण भूखंड चिल्ड्रेन पार्क म्हणून सिडकोने राखीव ठेवला होता. त्यातील काही भागावर वंडर्स पार्क उभारले असून शिल्लक असलेल्या २ हेक्टर भूखंडावर देखणे विज्ञान केंद्र आकारास येत आहे. सुरवातीला महापालिकेने या ठिकाणी विज्ञान केंद्र तसेच व्हिंटेज कार निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टेंडरही मागवण्यात आले होते. पण दोन वेळा फेरटेंडर काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. विज्ञान केंद्र या प्रकल्पातून व्हिंटेज कार प्रदर्शनी केंद्र वगळण्यात आले आहे. अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भव्य विज्ञान केंद्र बनवण्यात येणार असून या केंद्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा दिल्या जाणार असल्याने भविष्यात हे विज्ञान केंद्र नवी मुंबईच्या मानाचा तुरा ठरणार आहे.

सिडकोकडून विज्ञान केंद्रासाठीचा भूखंड वेगळा करुन १ एफएसआयसह करारनामा झाला. त्यासाठी महापालिकेने सिडकोला २४ कोटी १४ लाख रुपये अदा केले आहेत. शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वंडर्स पार्क शेजारीच विज्ञान केंद्राची निर्मिती होणार असल्याने या भागाला आणखीनच महत्व प्राप्त होत आहे. नवी मुंबई शहराची नवी ओळख ठरणाऱ्या या प्रकल्पाबाबत आयुक्त अभिजीत बांगर आग्रही आहेत.

विज्ञान केंद्र लहान मुलांसाठी आकर्षक तसेच रोजच्या व्यवहारात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर काय आहे व भविष्यात याचा फायदा याची प्रचिती देणारे ठरावे यासाठी त्यामध्ये विविध विभाग करण्यात येणार आहेत. पर्यावरण, जीवन, उर्जा, यंत्र व रोबोट, अंतराळ या महत्वपूर्ण घटकांचा त्याच्यात अंतर्भाव केला आहे. त्यामुळे हे विज्ञान केंद्र शहराबरोबरच युवा पिढीला आकर्षित करणारे शहरातील महत्वाचे केंद्र ठरणार आहे. नवी मुंबई प्रमाणेच शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या विविध महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी हे विज्ञान केंद्र आकर्षणाचे व पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. या केंद्राचे काम वेगात सुरु असून शहरातील नागरिकांना व युवापिढीला या केंद्राची उत्सुकता आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत हे विज्ञान केंद्र पूर्ण होणार आहे.
विज्ञान केंद्रात निसर्गासोबत कसे रहावे, परग्रहावर मानवास राहता येईल, भविष्यात आपल्यासाठीचे उर्जास्त्रोत कोठून मिळतील, भविष्यातील मनुष्याची कार्यपध्दती व प्रवास कसा असेल ही संकल्पना असणार आहे.

पुरं

नवी मुंबई शहरात विज्ञान केंद्रामुळे शहराला वेगळे महत्व प्राप्त होणार असून शहरासाठी हा प्रकल्प आयकॉनिक ठरणार आहे. शहरासाठी हा प्रकल्प भूषणावह ठरेल यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या ठिकाणच्या प्रत्येक कामावर नियंत्रण असून काम वेगात सुरू आहे.
– संजय देसाई, शहर अभियंता