Mumbai Tendernama
मुंबई

हँकॉक पुलावरील दोन लेनसाठी आता नवी डेडलाईन; ७७ कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेवरील हँकॉक पुलाचे काम गेले काही वर्षे रखडले होते. आता हे काम पूर्ण होणार असताना बाजूच्या इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जोपर्यंत या नागरिकांचे पुनर्वसन होत नाहीत, तोपर्यंत पुलावरील चार लेनपैकी दोन लेनवरील वाहतूक मे महिन्यापासून सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट स्टेशनजवळ असलेला ब्रिटीश कालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्याने २०१६ मध्ये जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर २०१८ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र अनेक अडथळे आल्याने पुलाचे कामे रखडले. पुलाचे काम सुरु झाल्यानंतर रुळाखाली पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसह अनेक प्रकारच्या युटिलिज गेल्याचे समोर आले. तसेच रुळा शेजारी झोपडपट्यांचा विळखा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाल्यानंतर पुलावर चार लेन सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र चार पैकी दोन लेनच्या शेजारी इमारती आहेत. या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत चार लेन सुरु करणे शक्य नाही. परंतु माझगाव, भायखळा परिसरातील रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन लेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लेनचे काम मे अखेरपर्यंत सुरु करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. यामुळे माझगाव परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

पूल पाडल्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदाराची कंपनी काळ्या यादीतील असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने नव्याने टेंडर मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढत, एकूण कंत्राट किंमत ७७ कोटीवर गेली.