Mumbai Tendernama
मुंबई

रखडलेल्या पेंधर उड्डाणपूल कामाला गती; ७० कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : तळोजा फेज दोनमध्ये पनवेल-दिवा रेल्वे मार्गावर जवळपास सत्तर कोटी रुपये खर्च करून पेंधर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या या कामाने पुन्हा गती घेतली असून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा संकल्प सिडकोने केला आहे.

सिडकोने तळोजा वसाहतीचे नियोजन करताना दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पेंधर येथे भविष्‍यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. याशिवाय पनवेल-मुंब्रा महामार्गावरून तळोजा आणि खारघरदरम्यान खाडी किनारामार्गे रस्त्याचे नियोजनही केले आहे.

पुलासाठी भूसंपादन करताना सिडकोने जमिनीच्या मालकी हक्काबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी केली नाही. जमीन मालकाने मालकी हक्काचा वाद उपस्थित केल्‍याने उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षे रखडले होते. चार वर्षांपूर्वी सिडको आणि जमीन मालकांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. सिडकोच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपूल उभारताना जमीन मालकांस सिडकोने काही मोबदला देण्याचे मान्य केले होते. मात्र सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली आणि काही वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे जमीन मालकाचा प्रश्न जैसे थे राहिला. त्‍यातच रेल्वे मार्गावर लोखंडी गर्डर उभारण्यासाठी रेल्वेच्या सीएसआर विभागाकडून परवानगी मिळविण्यास विलंब होत असल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. आता जमीन मालकांचा प्रश्न सोडविण्यात सिडकोला यश आले असून रेल्वेकडून गर्डर उभारणीसाठी परवानगी मिळाल्‍याने पुलाचे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागले आहे. येत्‍या डिसेंबरअखेर पुलाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा संकल्‍प आहे.

रेल्वे मार्गावर ३७ मीटरचा स्टील गर्डर
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पेंधर उड्डाणपूल उभारताना पुलाचे काम अधिक वेगाने व्हावे, यासाठी रेल्वे मार्गावर ३७ मीटरचा लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहे. गर्डर टाकण्यासाठी रेल्वे विभागाकडून परवानगी मिळाली असून लवकरच रेल्वे मार्गावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेणार आहे.

खाडीमार्गे खारघर रस्ता
तळोजा वसाहतीमधून खारघरमार्गे मुंबई-पुण्याकडे जाता यावे, यासाठी तळोजा फेज दोन ते खारघर येथील कोस्‍टल मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे सिडकोकडून नियोजन करण्यात आले आहे. हा रस्ता तळोजा आणि ओवापेठसमोरील खाडीमार्गे खारघर असा बांधण्यात येणार आहे. खाडीमार्गे रस्ता बांधताना पर्यावरण मंत्रालय आणि वन विभागाकडून विविध परवानग्या मिळविण्यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू असून याबाबतच्या परवानग्‍या अंतिम टप्प्यात असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेंधर रेल्वे फाटकाचे स्थलांतर
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पेंधर रेल्वे फाटक आहे. हे रेल्वे फाटक उड्डाण पुलाखाली असल्यामुळे कामात अडथळा येत असल्यामुळे ते स्थलांतरित करण्यात येणार आहे. काही अंतरावर नवीन रेल्वे फाटक उभारण्यासाठी सिडकोने रेल्वेकडे ९० लाख रुपये दिले आहे.

गृहनिर्माण प्रकल्पालगत उड्डाणपूल
सिडकोने काही दिवसांपूर्वी तळोजा सेक्टर २१, २२, २७, ३४, ३६ आणि सेक्टर ३७ मध्ये ५,७३० घरांची लॉटरी काढली होती. या सेक्टरमधील घरे उड्डाणपुलालगत आहेत. त्यामुळे तळोजामधून बाहेर पडण्यासाठी पनवेल, खारघर, शिळफाटा, मुंब्रामार्गे ठाणे आणि कल्याणला जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. येत्या महिनाभरात मेट्रो सुरू होणार आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास तळोजा वसाहतीच्या विकासात भर पडणार आहे.