Samruddhi Mahamarg Tendernama
मुंबई

'समृद्धी महामार्गा'वर 'या' वाहनांसाठी भरावा लागणार 6000 रुपये टोल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर दराने टोलचे (Toll) दर जाहीर झाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या टोलच्या दरानुसार हलक्या वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ९५१ रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी सहा हजार १४३ रुपये द्यावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे रविवारी (ता. ११ ) उद्‍घाटन झाले. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात १८ टोल नाके असतील. राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या वाहनांसाठीचे वेगवेगळे दर जारी करण्यात आले आहेत. हे पुढील दहा वर्षांसाठीचे दर आहेत. त्यानुसार दर तीन वर्षांनी त्यात वाढ होणार आहेत.

टोलचे दर (रुपयांत)


चार चाकी आणि हलकी वाहने :

पहिल्या तीन वर्षांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३. (संपूर्ण प्रवासासाठी ९५१ रु), दुसऱ्या तीन वर्षांसाठी २.०६ रुपये प्रतिकिलोमीटर (संपूर्ण प्रवासासाठी ११३३ रु), तिसऱ्या तीन वर्षांसाठी प्रतिकिलोमीटर २.४५ रुपये (संपूर्ण प्रवासासाठी १,३४७ रु) तर शेवटच्या वर्षासाठी २.९२ रुपये प्रतिकिलोमीटर (संपूर्ण प्रवासासाठी १६०६ रु) असा राहणार आहे.

हलकी व्यावसायिक, मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस :

पहिल्या तीन वर्षांसाठी प्रतिकिलोमीटर २.७९ रुपये, दुसऱ्या तीन वर्षांसाठी ३.३२ रुपये, तिसऱ्या तीन वर्षांसाठी ३.९६ रुपये, शेवटच्या वर्षासाठी ४.७१ रुपये.

बस अथवा ट्रक :

पहिल्या तीन वर्षांसाठी ५. ८५ रुपये प्रति किलोमीटर, दुसऱ्या तीन वर्षांसाठी ६ .९७ रुपये, तिसऱ्या तीन वर्षांसाठी ८.३० रुपये, शेवटच्या वर्षासाठी ९.८८ रुपये.

फूड प्लाझा अन अन्य सोयी
या महामार्गावर वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगांव (आसेगांव), गावनेर तळेगांव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार - वणोझा या ठिकाणी टोल नाके असणार आहेत. तसेच या ठिकाणी फूड प्लाझा आणि अन्य सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

समृद्धी महामार्गावर बैलगाडी, दोन चाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.