मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील (South Bombay) मलबार हिल (Malabar Hill) परिसरात उद्योगपती जे. पी. तपारिया (J P Taparia) यांनी तब्बल ३६९ कोटी रुपयांना लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. मलबार हिलमधील ही प्रॉपर्टी १.३६ लाख प्रतिचौरस फूट दराने विकण्यात आली आहे.
वाळकेश्वर रोडवरील लोढा मलबार टॉवरमध्ये (Malabar Tower) तीन मजले खरेदी करण्यात आले आहेत. या इमारतीच्या बाजूला राज्यपालांचे निवासस्थान असून दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि हँगिंग गार्डन आहे.
दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसर उच्चभ्रू वस्ती समजली जाते. अनेक शासकीय निवासस्थानांसह उद्योगपतींचे बंगले येथे आहेत. त्यामुळे येथे गृहप्रकल्पांच्या किमतीही तोडीस तोड असतात. मोठाली हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये असलेला हा परिसर समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे या परिसरात प्रॉपर्टीच्या किमती चढ्या असतात.
अशाच परिसरात वाळकेश्वर रोडवरील लोढा मलबार टॉवरमध्ये गर्भनिरोधक उत्पादक कंपनी फॅमी केअरचे संस्थापक तथा प्रसिद्ध उद्योगपती जे. पी. तपारिया यांनी मालमत्ता खरेदी केली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असून २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हे सुपर लक्झरी निवास १.०८ एकरांवर उभारण्यात येत आहे. या मालमत्तेसाठी तपारिया यांनी तब्बल १९.०७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. प्रति चौरस फुटाच्या हिशेबाने भारतातील ही मालमत्ता सर्वाधिक महागडी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी २५२.५० कोटी रुपयांना लक्झरी पेंटहाऊस खरेदी केले होते.