Railway Tendernama
मुंबई

Karjat To CSMT Via Panvel रेल्वेमार्गाचे टेंडर अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल (Karjat To CSMT Via Panvel) असा पर्यायी रेल्वे मार्ग प्रगतीपथावर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 2,782 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गाच्या अर्थ वर्कचे कंत्राट, तसेच छोटे ब्रिज, रेल्वे फ्लायओव्हर, उड्डाणपूल, रोड अंडर ब्रिजचे कंत्राट यांना अंतिम स्वरुप दिले जात आहे. या तीन कंत्राटांसाठी साईटवर जमीन सपाटीकरणाची प्राथमिक कामे सुरू आहेत.

पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा मार्ग एकेरी, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. काही मालगाड्या, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या त्यावरून धावतात. हा मार्ग दुपदरी करण्यात येत आहे. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर दोनच बोगदे आहेत. नव्या मार्गावर तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. 220 मीटर लांबीचा एक बोगदा नधालजवळ बांधला जात असून, दुसरा सुमारे 2600 मीटर लांबीचा आणि तिसरा वावराळे आणि कर्जतदरम्यान बांधला जात आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

पनवेल ते कर्जत एकूण 29.6 किलो मीटरच्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी 2 तास 19 मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास 1 तास 50 मिनिटे होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाची 25 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे. पनवेल आणि कर्जतवरून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत नोकरी, कामानिमित्त येत असतात. या मार्गामुळे एकाच लोकलमधून दोन्ही मार्गातील लोकांना प्रवास करता येणार आहे.