मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (BMC) २२६ कोटी खर्च करून मुंबईत पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात ही नालेसफाई नव्हे तर, सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये भ्रष्टाचार होऊन निव्वळ 'हाथ की सफाई' झालेली आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड (Prof. Varsha Gaikwad) यांनी केला आहे.
मान्सूनपूर्व १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा सत्ताधारी शिंदे व फडणवीस सरकार आणि मुंबई महानगरपालिका करत असली तरी मात्र वास्तव परिस्थिती भयावह आहे. प्रत्यक्षात मुंबईतील अनेक भागांत नालेसफाईची कामे झालीच नाहीत आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी टीकाही प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
धारावी येथील ६० फीट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी त्यांनी केली. त्यात अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून त्याच ठिकाणी पडून असल्याचे आढळले. काही भागात तर नालेसफाई झालीच नसल्याचे दिसून आले. अशीच भयानक परिस्थिती मुंबईच्या अनेक भागांत पहायला मिळत आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी जागरूक नागरिकांनी आमच्याकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेने २२६ कोटी खर्च करून मुंबईत पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात ही नालेसफाई नव्हे तर, सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये भ्रष्टाचार होऊन निव्वळ 'हाथ की सफाई' झालेली आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
या नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी तसेच ज्या भागाच्या नालेसफाईची कामे अजूनही झालेली नाहीत, ती ताबडतोब करावीत, अशी मुंबई काँग्रेस तर्फे आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.