मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील काटई नाका ते तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामावर सुमारे २१२ कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नुकतेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.
काटई ते नेवाळी नाका या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर विना अडथळा आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर खोणी नाक्यापासून तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग आहे.
या मार्गावर पूर्वी औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यात पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचण्यासाठी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या भागांतून प्रवासी या रस्त्याचा वापर करत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. त्यातील एका टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. आता याच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए प्रशासनाने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी टेंडर जाहीर केले आहे. रस्ते कामावर देखरेख करण्यासाठी सल्लागाराची मदत होणार आहे. या कामावर २१२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे, लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे.
खोणी ते तळोजा औद्योगिक वसाहत या मार्गाच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. याच मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षांत शेकडो नवी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यावर औद्योगिक वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. या रुंदीकरणामुळे प्रशस्त मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तळोजा, पनवेल, खारघर, नवी मुंबई आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ये-जा सुलभ होणार आहे. याच मार्गावर उसाटणेपासून नवा पर्यायी मार्ग उभारला जात आहे जो थेट जुन्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. तर, याच भागातून मेट्रो १२ प्रस्तावित असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरून वाहतूक करणे सोपे होणार आहे.