Kalamboli Tendernama
मुंबई

Navi Mumbai : कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण लवकरच; 1200 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील कळंबोली सर्कल हे मोठे वाहतूक बेट असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. लवकरच या सर्कलचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे डिझाईन पूर्ण झाले असून महिन्याभरात या १२०० कोटींच्या कामास सुरुवात केली जाणार आहे.

पनवेल- उरण ते मुंबई- ठाणेकडून जेएनपीटीकडे वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक वाहनांचे कळंबोली एमजीएम सर्कल येथून रात्रंदिवस मार्गक्रमण सुरु असते. कळंबोली सर्कल हे महत्त्वाचे जंक्शन आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच भेडसावते. कधीकधी तर तासनतास 'ट्रॅफिक जाम' होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती.

त्या पार्श्वभूमीवर पनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून या आधी बैठक आयोजित केली होती. कळंबोली सर्कलच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी सिडको आणि इतर यंत्रणांना दिला होता. मुंबई, ठाणे, कल्याण -डोंबिवली तसेच पनवेल उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाणे घेऊ लागल्यानंतर मुंबईतील 'एअर ट्रॅफिक' कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे काळाची गरज होती. जेएनपीटी, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज ४ पर्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज ५मध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या बाजूकडील 'एग्झिट' वर रोटरी प्रकारचे चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

सध्या असलेल्या सल्लागारासोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार घेऊन पुढील २० वर्षे पुन्हा नूतनीकरणाची गरज लागणार नाही, असे नियोजन करण्याचा सल्ला गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. जेएनपीटी बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, विमानतळावरून थेट पुण्याकडे जाणारी वाहतूक एकमेकांना अडथळा न करता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'रोटरी' प्रकारचे सर्कल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.