औरंगाबाद (Aurangabad) : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विशेष बाब म्हणून औरंगाबाद शहरासाठी मंजूर केलेल्या २५ कोटींच्या निधीतील रस्ते दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाला अंधारात ठेवून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेली वर्क ऑर्डर कोणत्याही ठेकेदाराने घेतलेली नसल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता होत असलेल्या या कामांबाबत आम्हीच अनभिज्ञ असल्याचे अजब उत्तर मिळाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद बाहेरील आणि महापालिका हद्दीतील महावीर चौक ते मिल काॅर्नर, दिल्लीगेट ते हर्सुल टी पाॅईंट, चिकलठाण्यातील कॅम्ब्रीज ते सावंगी वळण रस्ता, पुणे - औरंगाबादला जोडणारा काॅपैठण लिंकरोड, मिलर्नर ते मकबरा-औरंगाबाद लेणी, कांचणवाडी- विटखेडा-देवळाई- गांधेली- आडगाव- लाडगाव, चिकलठाणा - जुना बीडबायपास, शरणापूर- साजापुर- पंढरपुर- भिंदोन- भालगाव आदी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष बाब म्हणून २५ कोटी रूपयांचा निधी अशोक चव्हाण यांच्या आदेशाने मंजूर केला होता. यासंदर्भात सरकारने बांधकाम विभागाला गेल्या वर्षी आदेशही दिले होते. मात्र कोरोनाच्या दृष्टचक्रात निधी अभावी या रस्त्यांची दुरूस्ती रखडली होती. त्यानंतर रखडलेल्या या कामांचे टेंडर काढण्यात आले. वर्क ऑर्डर नसताना अशोक चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा देखील पार पडला होता. त्यात पुन्हा एकाही ठेकेदाराच्या हातात वर्क ऑर्डर नसताना या रस्त्यांची दुरूस्ती सुरू असल्याची धक्कादायक बाब टेंडरनामाच्या तपासात समोर आली आहे.
या कामांचा तपास करत असताना बांधकाम भवनातील टेंडर शाखेतून संपूर्ण लेखाजोखा काढला. त्यात सरकारने २१ जानेवारी २०२१ला औरंगाबाद येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरराव भगत यांना आदेशित केल्यानंतर त्यांनी खराब रस्त्यांची यादी आणि अंदाजपत्रक पाठवले होते. त्यानंतर टेंडर काढून २४ ऑगस्ट आणि १ डिसेंबर २०२१ मध्ये टेंडर काढून त्या खुल्या करण्यात आल्या होत्या. त्यावर २५ फेब्रुवारी २०२१ ला मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांनी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ३१ मार्च २०२१ ला अधीक्षक अभियंत्यांची तांत्रिक मान्यता देखील घेण्यात आल्याचे दिसते.
आधी वर्क ऑर्डर नसताना उद्घाटन
आधी वर्क ऑर्डर नसताना पाच कोटी रुपये दिल्याचा गवगवा करत मिल कॉर्नर-बीबी का मकबरा - लेणी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात या रस्त्यासाठी केवळ साडेतीन कोटी तेही किरकोळ दुरूस्तीसाठी देण्यात आले. धक्कादायक म्हणजे करोडी फाटा येथे शरणापूर-साजापूर रस्त्याचे भूमिपूजन करताना ५३ कोटी जाहिर करण्यात आले. प्रत्यक्षात या रस्त्यासाठी केवळ २ कोटी रूपये खर्चून किरकोळ दुरूस्तीची टेंडर काढूप ठेकेदार नेमण्यात आला आहे.हीच बाब अन्य रस्त्यांबाबत घडली आहे.
आता वर्क ऑर्डर नसताना दुरूस्ती
एकीकडे शहरातील बहुतांश रस्ते तीनशे कोटीच्या प्रतिक्षेत असताना दुसरीकडे शहर व परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याला अंधारात ठेवून वर्क ऑर्डरविनाच करण्यात यात आहेत. विशेष म्हणजे उप विभागीय अभियंता डी. एस. कांबळे यांना आपल्याच कार्यक्षेत्रात होत असलेल्या कामाबाबत अनभिज्ञता कशी काय असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कामात गत वर्षी झालेल्या रस्त्यांची देखील नावे टाकण्यात आल्याचे दिसते.
नियमांना बगल
कुठल्याही प्राप्त ठेकेदाराला दुरूस्तीचे काम करायचे असेल तर त्यासाठी दोन पर्याय असतात. पहिला त्या कामाची अनामत रक्कम भरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधीत विभागांची ना- हरकत घेतल्यानंतर आणि दुसरा पर्याय म्हणजे त्या कामासाठी बांधकाम विभागाकडुन रितसर वर्क ऑर्डर घ्यायची. परंतु या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार ड्रीमलॅन्ड कन्सट्रक्शन व इतरांनी बांधकाम विभागाकडुन कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. किंवा त्याबाबत बांधकाम विभागालाच कळवलंही नाही.
कोण काय म्हणाले -
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता डी. एस. कांबळे यांना विचारले असता मी नव्यानेच रूजु झाल्याने या कामांची माहिती घेऊनच सांगता येईल असे ते म्हणाले. दुसरीकडे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना विचारले असता या कामात कमी जास्त दराने कामाचे वाटप झाल्याचे सांगत त्यांनी टेंडर शाखेतील लिपिक प्रशांत सदावर्ते यांना टेंडरनामा प्रतिनिधीला सविस्तर माहिती देण्याचे आदेशित केले.
नेमकी येथेच दिसली गडबड
सदावर्ते यांनी या रस्त्यांची टेंडर प्रक्रिया सर्कलमधून झाल्याचे सांगत रस्ते दुरुस्तीच्या कामासंदर्भात अर्धवट माहिती दिली. यात चिकलठाणा ते जुनाबीडबायपास, कॅम्ब्रीज चौक ते सावंगी, महावीर चौक ते मिल काॅर्नर, दिल्लीगेट ते हर्सुल टी पाॅईंट. मिलर्नर ते मकबरा - औरंगाबाद लेणी या रस्त्यांची माहिती मागितली असता सदावर्ते यांनी तांत्रिक शाखेकडे बोट दाखवले.
काहींना वर्क ऑर्डरची प्रतिक्षा काहींची कामे सुरू
दरम्यान रस्त्यांची पाहणी केली असता विना वर्क ऑर्डर काम सुरू असल्याचे दिसले. दुसरीकडे ड्रीमलॅन्ड कन्सट्रक्शनचे ठेकेदार रहीम शेख यांना विचारले असता लोकांची ओरड होत होती. अपघाताचे सावट असल्याने काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. तर चारनिया कन्सट्रक्शनचे रमजान चारणीया यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने वर्क ऑर्डर मिळाली नसल्याचे सांगत आठ दिवसात आम्ही काम सुरू करू असे ते म्हणाले.