Nitin Gadkari Tendernama
मराठवाडा

चौपदरीकरणातून 'बायपास' गेवराईकरांना नितीन गडकरी न्याय देणार का?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद - पैठण (Aurangabad - Paithan) मार्गावर सर्वांत छोट्या असलेल्या गेवराई तांडा या गावाला चौपदरीकरण योजनेतून बाद करून या गावासाठी बायपास देण्यात आलाय. हा बायपास धनदांडग्यांच्या आणि बड्या लोकांच्या जमिनींना लाभ देण्यासाठी घुसडवल्याचा आरोप गेवराई तांडा येथील शेतकऱ्यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना केला. याबाबत गावकऱ्यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे तक्रार केली होती. भुमरे यांनी हा मुद्दा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर या मार्गावर कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही. मी यात जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

बहुप्रतिक्षित औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना निघाली. पाठोपाठ केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. काही 'बड्या' लोकांच्या जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बदलल्याचा खटाटोप भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सरळ मार्गाने जाणाऱ्या रस्त्याला वळण कशासाठी देण्यात आले, असा सवाल गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. भुमरे यांनी ही बाब गडकरींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

विशेष म्हणजे बायपास आपल्या जमिनीतून जाणार असल्याची अधिसूचना जाहीर होताच या बड्या लोकांनी चक्क मोठमोठी झाडे शेतात लावल्याच्या आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. काहीही कारण नसताना गावाला योजनेतून बायपास केले, तसेच काहींनी योजनेतील फळबागा अनुदान लाटण्यासाठी एकाच रात्रीत फळबागा उभ्या केल्या, असा गेवराई तांडाच्या ग्रामस्थांचा आरोप आहे.

औरंगाबाद - पैठण या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याचे समजताच काही धनदांडग्यांनी या मार्गावर जमिनी घेऊन ठेवल्या. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बडे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक आणि राजकारण्यांचा समावेश आहे.

गडकरी काय भूमिका घेणार?

औरंगाबाद-पैठण या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात या रस्त्यावरील सर्वांत छोटे गाव असलेल्या गेवराई तांड्याला चक्क योजनेतून बायपास करून तांड्याच्या पूर्वेला असलेल्या धनदांडग्यांच्या जमिनींमधून हा रस्ता घालण्याचे कारस्थान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि कंसल्टंटने केल्याचा मुद्दा भुमरे यांनी गडकरींच्या लक्षात आणूण दिला. त्यावर आता गडकरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेवराई तांडा गाव केले बायपास

गेवराई तांडा या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता (रिअलाईनमेंट) करण्यात येणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल. तर गेवराई तांडा गावापेक्षा मोठे असलेल्या गावांना मात्र बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे या गावात अतिक्रमणे नाहीत, वाहतूक कोंडी होत नाही, फार गजबजलेलेही गाव नाही, तरीही या गावाला बायपास केले आहे.

यासंदर्भात गेवराईकर गडकरींची भेट घेणार होते. मात्र हा घोडेबाजार गडकरींना कळू नये यासाठी काही बड्या राजकारण्यांनी हा बायपास रद्द करून गावातूनच टाकणार असल्याच्या भूलथापा देत गावकऱ्यांची समजूत काढण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी भुमरे यांच्यामार्फत गडकरींकडे हा प्रकार पोहचवला.

पंधरा दिवस आधी जमीन खरेदी

कोणत्या गटातून हा रस्ता जाणार आहे, याची माहिती देणारे थ्री-ए नोटफिकेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने २ एप्रिल रोजी प्रकाशित केले. या नोटिफिकेशनच्या केवळ १५ दिवस आधी म्हणजे ८ मार्च २०२३ रोजी रविंदरसिंग खुशबिरसिंग बिंद्रा, हरविंदरसिंग बसंतसिंग बिंद्रा, खुशबिरसिंग बसंतसिंग बिंद्रा, हरप्रितसिंग हरविंदरसिंग बिंद्रा, नरिंदरसिंग बसंतसिंग बिंद्रा, हरप्रितसिंग हरविंदरसिंग बिंद्रा, प्रब्ज्योतसिंग हरविंदरसिंग बिंद्रा यांनी गेवराई तांड्याच्या गट क्रमांक ९३ मध्ये २ कोटी २३ लाख ८५ हजार रुपयांमध्ये ६ एकर दोन गुंठे शेतजमीन खरेदी केली.

कोण आहेत हे बिंद्रा?

बिंद्रा हे औरंगाबादेतील गुरूनानक इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक आहेत. दोन वर्षापूर्वी औरंगाबाद- पैठण रस्ता दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले होते. साडेसात कोटी रुपये खर्च करून केलेल्या डागडूजीवर आज जागोजागी खड्डे आहेत.