छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे शतकोटी वृक्ष लागवड मोहीमेत दरवर्षी लाखो नव्या वृक्षांंची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची कत्तल करून या मोहीमेला हरताळ फासला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील एकमेव मोठा ऑक्सिजन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट लगत हरित पट्ट्यातील जवळपास साडेपाच किलोमीटर मार्गावर १२०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी अडथळा ठरत असलेल्या हजारो झाडांची कत्तल सुरू असून सिडकोतील जळगाव रस्त्यावरील गरवारे कंपनीसमोरील हरित पट्ट्यातील शेकडो मोठ्या झाडांचा बळी या प्रकल्पाने घेतला आहे.
यासंदर्भात कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता आता सुरूवात झाली आहे. पुढे सिडको बसस्थानकापर्यत अनेक झाडे तोडावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मंजूर झालेली नवीन पाणी पुरवठा योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या शहरात सगळीकडेच मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खोदाई सुरू आहे. मुख्य गुरुत्व व वितरण जलवाहिनी टाकण्यासाठी जवळपास रस्त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाच हजार किलोमीटर खोदाई केली जाणार आहे. दरम्यान सिडको टी पाॅईंट ते हर्सुल टी पाॅईंट जळगाव रस्त्याच्या कडेला साडेपाच कि.मी.च्या हरितपट्ट्यात १२०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी टाकत असताना पोकलॅन्डने खोदाई केली जात आहे. त्यामुळे या मार्गांवरील साडेपाच किलोमीटर अंतरावरील हरितपट्ट्यातील अंदाजे दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
सध्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनी ते वोक्हार्ड कंपनीसमोरील हरितपट्ट्यात जलवाहिनीसाठा खोदाईचे काम काम प्रगतीपथावर असून या दोन्ही कंपनीसमोरील जलवाहिनी आड येणारी पाचशे हिरवीगार झाडे मुळासकट काढून टाकण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. मात्र महानगरपालिकेतील उद्यान विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त नोंद नसलेली बरीचशी लहान-मोठी झाडेही तोडली जात असून वृक्षतोडीचा प्रत्यक्ष आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे शंभर-दीडशे वर्षे जुने वृक्षही या रुंदीकरणात नामशेष होत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीने नेमलेला पोटकंत्राटदार सध्या जलवाहिनीसाठी खोदाई करत असताना ही वृक्षतोड करत आहेत. धक्कादायक म्हणजे याठिकाणी घनदाट वृक्षवल्ली असताना ब-याच ठिकाणी वाळवंट झालेले आहे. मात्र कापलेली झाडे कोणी कुठे लंपास केली , हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे मोठी वृक्षतोड झालेली असताना जागेवर एकही झाड किंवा फांद्या दिसत नाहीत. मग हा लाकुडफाट्याचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने जवळपास तीन कोटी रूपये खर्च करून जळगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला हरित पट्ट्यात झाडांची लागवड केली होती. मात्र जलवाहिनीला अडथळा बनत असल्याचे कारण पुढे करून हजारो झाडांची कत्तल झाल्याने होणारी वनसंपदेची हानी भरून काढण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून कंत्राटदार कंपनीला परवानगी देताना जरी दुप्पट झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी दिली असेल, तरी दुष्काळात हा कंत्राटदार कुठे झाडे लावणार, त्यांची वाढ कधी होणार, ती झाडे कधी सावली देणार, असे म्हणत शहरातील काही वनसंवर्धन संस्था, निसर्गप्रेमी नागरिकांकडून हरितपट्ट्यात जलवाहिनी टाकण्यासाठी विरोध केला जात आहे.
मात्र कंत्राटदार कंपनी वृक्षतोडीबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न करत असून तोडलेली झाडे बाजूला जागेवरून रातोरात गायब केली जात आहेत. यासंदर्भात तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावून कोट्यवधींची माया कंत्राटदार हडप करत असल्याचाही आरोप केला जात आहे.