औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपास रस्त्यावर संग्रामनगर चौकाच्या अलीकडे आमदार रोड असून, सातारा परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखेने येथे पूल उभारला आहे. मात्र पुलाचे सदोष बांधकाम झाल्याने आमदार रोड ब्लाॅक होणार असल्याचे 'टेंडरनामा' पाहणीत समोर आले आहे. या संदर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील पुलाचे बांधकाम चुकीचे असल्याचे म्हणत अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे संतप्त नागरीकांनी पुलाचे बांधकाम बंद केले आहे.
बीड बायपास रस्त्यावर झालेल्या चुकीच्या पुलाच्या बांधकामामुळे सातारा परिसरातील सुमारे १५ ते २० हजार वाहनधारकांना फटका फसणार आहे. यात दररोज इंधनाच्या खर्चासह अपघाताचा धोका देखील पत्करावा लागणार आहे. पुलाचे डिझाइन करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पुलाचे बांधकाम बंद करण्याचा इशारा दिलीप काळे यांनी दिला आहे. यासंदर्भात 'टेंडरनामा' प्रतिनिधीने गुरूवारी सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत सर्वेक्षण केले असता, पुलाची उंची कमी केल्याने आमदार रोड परिसरातील वाहनधारकांना संग्रामनगर पुलाला वळसा घालून देवळाई चौकाकडे जावे लागणार आहे. याचे अंतर किमान आठशे मीटर असल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होणार आहे. दुसरीकडे संग्रामनगर उड्डाणपुलाकडून आमदार रोड मार्गे सातारा गावात शिरताना चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे. मात्र गावातील गॅस गोडाउनवर येणाऱ्या तसेच शासकीय अन्नधान्य दुकानांवर माल वितरण करणाऱ्या वाहनांनी सातारा गावात कसे शिरायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पुलाचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. यामुळे आमदार रोड आणि संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या जडवाहनांची मोठी अडचण होणार आहे. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. मी संबंधीत अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे.
- चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार
साताऱ्यातील आमदार रोड हा वहिवाटीचा रस्ता आहे. आमदार रोड आणि संग्रामनगर या दोन ठिकाणी प्रवेश करण्यास जागा ठेवणे बंधनकारक होते. वहिवाट रस्ता पुलाच्या कमी उंचीमुळे ब्लाॅक होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणीत भर पडली आहे. हा पूल पाडून नव्याने बांधकाम केले तरच प्रश्न सुटणार आहे. आठ दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी आमदार रोड १० फूट खोदला होता. आम्ही विरोध केल्याने काम बंद केले.
- दिलीप काळे