छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : वार्ड क्रमांक ७२ झांबड इस्टेट परिसरातील महाकालेश्वर महादेव तथा रेणूकामाता मंदीरला लागून असलेल्या एका नाल्याची भींत कोसळल्याने तो धोकादायक झाला आहे. नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळेही आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे येथील भाविकांसह आसपासच्या रहिवाशांचा ताप वाढला आहे. तब्बल दीड वर्षापासून हा नाला उघडा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
या संदर्भात माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्याशी संपर्क केला असता G-20 साठी आलेल्या निधीतून १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पडझड झालेल्या नाल्यांची दुरूस्ती व नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व काही ठिकाणी नाल्यांवरील धोकादायक पुलांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याच निधीतून सदर नाल्याची दुरुस्ती करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात झालेल्या अतिवृष्टीने श्रेयनगर झांबड इस्टेटच्या पाठीमागे ज्योतीनगरच्या मधोमध असलेल्या नाल्याची भींत पडून नाला उघडा पडला. परिणामी अवकाळी आणि मोसमी पावसाळ्यात नाल्याचे पाणी मंदिर परिसरात तुंबते. मात्र तीन ते चार वर्षे उलटून गेल्यानंतरही नाल्याची भींत बांधण्यात आली नाही.
नाला दुरुस्त करण्याची जबाबदारी वार्ड अभियंत्यांची आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. मागील वर्षी धार्मिक स्थळासह वसाहतीत पावसाचे पाणी शिरल्याने त्यावेळी नाला दुरुस्तीची नागरिकांना अपेक्षा होती. मात्र दुरुस्तीसाठी निधी नसल्याच्या कारणांमुळे नाला दुरूस्तीचे काम रेगाळल्याने तो ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात आणखी स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
धक्कादायक म्हणजे माजी सभापती रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांच्या विशेष प्रयत्नाने बांधलेल्या बॅडमिंटन हाॅलच्या पाठीमागे नाल्याला लागून मोकळी जागा असल्याने वसाहतीतील चिमुकली तेथे खेळण्यासाठी येतात. मात्र त्याच भागात नाल्याची भींत पडल्याने चिमुकल्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येथील उघड्या नाल्यातील घाण व दुर्गंधीमुळे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः नाल्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या ज्योतीनगरातील महादेव मंदीर देखील नाल्याच्या काठावर आहे. तिकडील रहिवाशी आणि भाविकांना देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लागलीच या नाल्यावर स्लॅब टाकवा, नाल्याचे खोलीकरण करावे, नाल्यावरील पुलांची दुरुस्ती करावी, कोसळलेली भींत बांधावी, नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी झांबड इस्टेटसह ज्योतीनगर, सहकारनगर व श्रेयनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.