Haribhau Bagde Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : नारेगाव-पिसादेवी 4 किमीचा प्रवास का बनलाय जीवघेणा?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नारेगाव ते पिसादेवी या रस्त्यावर चार किलोमीटर पर्यंत पडलेल्या खड्यांमुळे प्रवास करणे धोकेदायक नव्हे तर जिवावर बेतण्यासारखे झाले आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्यातून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने सोडाच साधी सायकल चालवणे देखील कठीण झाले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले असून, यात दुचाकी आणि चारचाकी वाहने आपटून अपघात होत आहेत. अशी परिस्थिती असताना फुलंब्री मतदार संघाच्या आमदारांनी झोपेचे सोंग घेतले आहे काय, असे वाटावे अशी स्थिती आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अभियंत्यांना जाब विचारणेही गरजेचे वाटत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महानगरपालिकेने पिसादेवी रस्त्याला जोडणारे हर्सुल ते पिसादेवी, आंबेडकर नगर ते जाधववाडी असे अर्धवट काॅंक्रिटचे रस्ते बनवले पण पुढे निम्मे रस्ते हद्दीच्या वादात रखडले आहेत. त्यात नारेगाव ते पिसादेवी या रस्त्याचा मालक कोण, या वादात गत तीस वर्षांपासून रस्त्यावर डांबर शिंपडले देखील नाही. 

नारेगाव ते पिसादेवी मार्गावर सुखना नदीवरील पूल गत अनेक वर्षांपासून पुरात वाहून गेला आहे. पुलाचा खोलगट भाग असल्याने उंची वाढवणे आवश्यक आहे. परंतु अद्याप संबंधित बांधकाम विभागाच्यावतीने पुलाची दुरुस्ती करण्यात न आल्याने यंदाच्या पावसाळ्यात हा मार्गच बंद होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नारेगाव - पिसादेवी या चार किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागांनी आडकाठी केल्याने सदर रस्ता जैसे-थे त्या परिस्थितीत ठेवल्याने या चार किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.

पिसादेवी गावापासून नारेगाव पर्यंत रस्त्यावर खड्यांची मालिकाच सुरू होते. त्यात आता पावसाळ्यात खड्यांत पाणी साचलेले असते. अनेक ठिकाणी खड्यांचा आकार एवढा मोठा आहे की, त्यातून ट्रक बाहेर काढणे कसरतीचे ठरत आहेत. रात्री अनेक दुचाकींना अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणाहून प्रवास करताना जीव मुठीत धरून वाहन चालकांना वाहने चालवावी लागतात.

पिसादेवी, पोखरी, पळशीशहर, आडगाव, वरझडी, सुलतानपुर, व अन्य गावांतील अनेक रुग्ण उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जातात. या रस्त्यावरून जाताना अनेकवेळा गंभीर रुग्णांचा या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर उपचाराविनाच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.

सदर चार किलोमीटरचा भाग हा अनेक मोठमोठ्या गृहप्रकल्पातून येतो. आसपास मोठे शेतीक्षेत्र येते. शिवाय चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील कामगार, चिकलठाणा आठवडी बाजारात जाणारे शेतकरी, शाळा - महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी यांना या रस्त्याचा वापर करणे अवघड होऊन बसले आहे. परंतु रस्ते बांधकाम विभागाकडून सदर चार किलोमीटरच्या रस्त्यावर डांबरीकरण अथवा काॅंक्रिटीकरण केले जात नसल्याची खंत गावकरी व्यक्त करत आहेत.

आमदारांचेच काम होत नाही; रस्त्यांचे काय होणार?

फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी व गोठ्याच्या ७०० फायली पंचायत समितीमध्ये एक वर्षापासून प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीत आठ तास ठिय्या आंदोलन केले. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना बागडेंना ठिय्या आंदोलन करावे लागते.

एवढे करूनही मुजोर अधिकाऱ्यांनी त्यादिवशी एकाही शेतकऱ्याचे काम केले नाही. त्यामुळे फुलंब्री मतदार संघातील वाटा कशा सुधारतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकाम विभाग,  पंचायत समिती, जिल्हा परिषद , विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी आणि महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचे बागडे यांच्या ठिय्या आंदोलनावरून उघड होत आहे. 

सीईओंच्या झाडाझडतीनंतर...

बागडेंच्या ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी झेडपी सीईओ विकास मीना यांनी पंचायत समितीची झाडाझडती घेतल्यानंतर पाच पंचायत समितीचे अधिकारी दाखल झाले. त्याच दिवशी ७०० पैकी ५०० फायली निकाली काढल्या. यासाठी खास सिल्लोड, खुलताबाद, कन्नड, पैठण, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीतील अधिकारी कामाला जुंपले. त्यांनी अवघ्या आठ तासांत ५०० फायलींचे काम केले.

सीईओ विकास मीना यांनी बागडेंच्या आंदोलनाची दखल घेतल्याने हे काम झाले. मात्र बागडेंनी ठिय्या आंदोलन सुरू करताच कार्यालयातून पळ काढणाऱ्या बीडीओ ज्योती कवडदेव यांच्यावर सीईओ काय कारवाई करणार? गत वर्षभरापासून संचिका धुळखात का पडल्या, हा प्रश्न सीईओ विचारणार की नाही, बागडेंच्या आंदोलनानंतर प्रकृतीचे कारण देत पळ काढणाऱ्या कवडदेव यांच्यावर सीईओ काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिरापूरवाडी वरूड रस्त्याचे काय?

चार वर्षांपुर्वी बागडे यांच्या पाठपुराव्यामुळे हिरापूरवाडी ते वरूड या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मुदत संपून देखील काम झाले नाही. 'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेनंतर बागडे यांनी ठिय्या आंदोलन केले होते. तरीही नगरचा मनिषा कंस्ट्रक्शनचा किरण पागोरे हा ठेकेदार बधला नाही. फुलंब्री मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची वाट लागलेली आहे. आता याच आंदोलनाप्रमाणे बागडेंनी फुलंब्री मतदार संघातील रस्त्यांसाठी आंदोलन केल्यास ग्रामस्थांना न्याय मिळू शकेल, अशी आशा आहे.