Abdul Sattar Tendernama
मराठवाडा

मंत्र्यांच्या मुलाच्या लग्नासाठी भूमिगत गटारीचा 'डाव' नागरिकांनी का उधळला?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एका राज्यमंत्र्याच्या मुलाच्या लग्नासाठी महापालिकेच्या ड्रे्नेज विभागातील अधिकाऱ्यांनी खास यंत्रणा कामाला लावत एका लाॅन मालकासाठी चक्क घाईगडबडीत भूमिगत गटारीच्या कामाला सुरवात केली. मात्र या कामात अनियमितता तसेच निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे आढळून येताच परिसरातील जागृत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर कामाचे फोटो व्हाट्सअप करत कामात सुधारणा करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या नंतर यंत्रणा सुतासारखी सरळ झाली आणि दर्जेदार कामाला सुरवात झाली.

मात्र दरम्यान जनतेच्या पैशाचे वाटोळे तर झालेच, पण पुढे भूमिगत गटारीच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने सांडपाणी तूंबण्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा परिसरातील बीडबायपासला लागून असलेल्या राजेशनगर येथील गट क्रमांक-१२८ मध्ये घडला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी बीड बायपास रस्त्यालगत आयकाॅन लाॅन या खाजगी मालमत्ते पासून ते सातारा हद्दीतील गट क्रमांक -१२८ राजेशनगर ते रेल्वे रुळालगत घाईगडबडीत भूमिगत गटारीच्या कामाला सुरवात करण्याचा प्रताप महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांनी केला. अवघ्या दोन दिवसांत दोन लेबर ठेकेदारांमार्फत हे काम करण्यात आले.

विशेष म्हणजे सातारा - देवळाईसाठी केंद्र सरकारच्या अमृत - दोन योजनेत मंजूर करण्यात आलेली भूमिगत गटार योजनेच्या कामाचे टेंडर अहमदाबादेतील अंकिता कन्स्ट्रक्शन कंपनीने ९.२० जास्त टक्के दराने घेतले आहे. या योजनेसाठी २५२ कोटी ५३ लाख १५ हजार ३१० रुपये मंजूर केलेले आहेत. दिवाळीच्या सुटीमुळे कामगार गावी गेल्यानंतर काम बंद आहे. तरीही महापालिकेच्या ड्रे्नेज विभागातील अधिकाऱ्यांनी दोन खाजगी लेबर ठेकेदारांना हाताशी धरून काम सुरू केले.

मात्र, हे काम करताना ठेकेदारांनी आयकाॅन लाॅनच्या भिंतीला भगदाड पाडून तेथील खाजगी सेफ्टी टॅंकपासून ते पाठीमागे असलेल्या राजेशनगर ते रेल्वे रुळालगत दक्षिण - उत्तर दिशेला थेट पाचशे मीटर अंतरात नागरीकांच्या दारासमोर नाली खोदत ढोबळ मानाने २० फुटांचे व ९ इंचाचे पाइप अंथरूण त्यावर खोदलेली माती ढकलून ठेकेदारांनी पलायन केले.

हे काम घाईगडबडीत उरकतांना त्यांनी भूमिगत गटार योजनेच्या अंदाज पत्रकानुसार काही त्यांनी ठराविक अंतरावर चेंबर बांधले नाही. पुढील लोकसंख्येच्या तुलनेत पाइपलाइन देखील कमी व्यासाची टाकल्याने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून पाइपलाइन टाकूनही आपल्या नशीबी पुन्हा गाळ दुर्गंधी आणि चिखलातूनच वाट काढावी लागण्याची वेळ येणार, अशी शंकेची पाल राजेश नगरवासीयांच्या मनात चुकचुकली.

दरम्यान, महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील नियोजन शुन्य अधिकाऱ्यांचा हा प्रताप लक्षात येताच नागरिकांनी उप अभियंता अनिल तनपुरे यांना संपर्क साधला व त्यांना सदर कामात अनियमितता तसेच काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. या धक्कादायक प्रकार प्रशासकांपुढे येऊ नये यासाठी गुरुवारी तनपुरे यांनी ठेकेदारांना सावध करत शुक्रवारी सकाळीच भूमिगत केलेली पाइपलाइन उकरून काही ठराविक अंतरावर चेंबर बांधण्याचे काम सुरू केले.

दरम्यान ही पाइपलाइन जेसीबीच्या पात्यांनी उकरली व चेंबरचे बांधकाम सुरु केले. मात्र अधिकाऱ्यांच्या अशा उरफाट्या कारभारामुळे अनेक ठिकाणी पाइप फुटून जनतेच्या पैशाचे पार वाटोळे झाले. मात्र जरी जागृत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देताच धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा केली असे असले, तरी पुढे सांडपाणी वाहून नेण्यासाठी टाकलेले पाइप जोडण्यासाठी आउट लेट नसल्याने दुर्गंधी व गाळ आणि चिखलातूनच राजेशनगरवासीयांना अगदी तारेवरची कसरत करीत वाहने व पायी प्रवास करावा लागणार आहे, अशी शक्यता येथील रहिवाशांकडून वर्तवली जात आहे.

बीडबायपासवरील आयकाॅन लाॅनवर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा रविवारी येत्या १९ नोव्हेंबरला विवाह संपन्न होणार आहे. दरम्यान या शुभकार्यात लाखोंनी वऱ्हाडीमंडळी येणार. मात्र सदर आयकाॅन लाॅन हे महानगरपालिकेच्या नो -डेव्हलपमेंट झोनमध्ये असल्याने तेथे ड्रेनेजची स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. मात्र सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी खास सातारा, देवळाई व बीडबायपासकरांसाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून मंजूर असलेल्या भूमिगत योजनेतून तातडीने पाइप लाइनचे काम करण्यात आले, असा आरोप राजेश नगरातील शेकडो नागरिकांनी केला आहे.