Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद की 'कचराबाद'! कोट्यवधींचा मलिदा कोण खातय?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : एकीकडे प्रदूषणाशी मुकाबला म्हणून औरंगाबादकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी महापालिका कोट्यवधीचा खर्च करत आहे. दुसरीकडे जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगर शहराची शोभा वाढवत आहे. विशेष म्हणजे शहरातील कचरा संकलनावर एका ठेकेदाराला दरमहा कोट्यवधीचा मलिदा वाटला जात असताना आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या चारही बाजुने कोट्यवधीचे प्लॅन्ट उभारलेले असताना औरंगाबादेत जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगर का, असा प्रश्न 'टेंडरनामा'च्या पाहणीत उपस्थित होत आहे.

महापालिका प्रशासनावर टीकास्त्र

दरम्यान, 'टेंडरनामा' प्रतिनिधी कचऱ्याचे फोटो कॅमेऱ्याद कैद करताना अनेकांनी शहराच्या स्थितीवर कडवट प्रतिक्रिया दिली. 'आम्ही औरंगाबादी नव्हे कचराबादी आहोत', वर्षानुवर्षे औरंगाबादच्या कचरापट्टीत अडकलो आहोत,' अशी टीका त्यांनी केली. औरंगाबादकरांसह देश-विदेशातील नागरिक कचराकोंडीवर तोंडसुख घेत असूनही महापालिका प्रशासक का उदासीन आहेत. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचल्याने दुर्गंधीच्या नरकयातनेतून औरंगाबादकर वाट काढत आहेत, असे या नागरिकांचे म्हणणे होते.

नाक दाबा, वाट शोधा

शहरात प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा कचरा साचल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरभर कचऱ्याचे अक्षरश: डोंगर उभे आहेत. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे कचरा ओला पडत आहे. पावसामुळे कचरा कुजल्याने तीव्र दुर्गंधी सुटल्यामुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. नाक दाबून वाट शोधावी लागत आहे. गत चार दिवसापासून सुरू असलेल्या पाऊसामुळे भयंकर समस्या निर्माण झाली आहे. आठ-आठ दिवस एका जागेवर कचरा पडून राहत असल्यामुळे रहिवासी हवालदिल आहेत.

कोट्यवधीचा मलिदा लाटूनही...

शहरात कचरा उचलण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठी हैदराबादच्या पी. गोपिनाथ रेड्डी कंपनीला ठेका दिला आहे. कचरा संकलन आणि त्याची कचरा प्लॅटपर्यंत वाहतूक करून तो खाली करणे याकामासाठी त्याला दरमहा अडीच कोटीचा मोबदला दिला जात आहे.

कोट्यवधीचे प्लॅन्ट तरीही...

संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा, कांचणवाडी, पडेगाव आणि हर्सुल येथे कचरा प्रक्रिया केंद्र उभारलेले आहेत. याचा ठेका मायोवेल्स कंफनीला देण्यात आला आहे. त्यावर देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे.

कुठे आहे नागरी मित्र पथक

विशेषतः उघड्यावर कुणी कचरा टाकू नये यासाठी माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक तैनात करण्यात आले आहे. असे असताना महानगरपालिकेला अद्यापही कचराकोंडी सोडविण्यात अपयश का येत आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

औरंगाबाद की कचराबाद?

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिग जमा झाले आहेत. एवढेच नव्हे शहरातील आरोग्य केंद्रे, वाचनालये, धार्मिक स्थळे, सन्मित्र काॅलनीतील मराठवाडा साहित्य परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार, नाट्य व सिनेमागृहे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी सार्वजनिक ठिकाणी कचरा सर्वत्र विखुरला गेला आहे. विविध चौकात कचरा असल्यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शहरातील वेगवेगळे खासगी क्लासेस आणि शाळा महाविद्यालयात देखील हीच स्थिती असल्याने विद्यार्थ्यांची सर्वाधिक आरोग्याची समंस्या निर्माण झाली आहे. मागील चार दिवसांपासून तर शहरभर प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. औरंगाबादकरांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरातील पर्यटनस्थळांच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना आधी कचरादर्शन घेऊनच पुढे जावे लागत आहे.