Aurangabad Railway Station Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या दुर्दशेला जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : भव्य इमारतीच्या शेजारीच जुनी कुलूपबंद इमारत, आत बाहेर कचरा, नव्या इमारतीत किळसवाणे कँटीन, सुरक्षेबाबत बोंब...नावालाच असलेले मेटल डिटेक्टर, खराब विद्युत उपकरणे आणि गळणारे पर्यटन केंद्र...बंदिस्त प्रथमोपचार केंद्र, जिकडे-तिकडे लोळत पडलेले गर्दूले...ही परिस्थिती आहे औरंगाबाद रेल्वेस्थानकाची! त्यामुळे माॅडर्न नव्हे, तर गचाळ स्थानक म्हणून औरंगाबाद रेल्वे स्थानकाची ओळख निर्माण झाली आहे. (Aurangabad Railway Station News)

स्थानकाबाहेरही अशीच परिस्थिती आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करतानाच असंख्य रिक्षा रस्त्यात उभ्या असतात. प्रवेशद्वारासमोरच खड्डे आणि पाण्यातून वाट शोधत आत गेल्यावर बंद कारंजा, गाजरगवत आणि कचरा, रिकामे प्रीपेड बूथ, धूळखात पडलेले वाॅटर व्हेंडिंग मशीन तुमचे स्वागत करते.

रेल्वे प्रशासनाचे एकमेकाकडे बोट

रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेबाबत विचारणा केली असता दक्षिण मध्य रेल्वेचे (South Central Railway) मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे म्हणाले की रेल्वे स्थानकाच्या पुढील टप्प्यांचा विकास करण्यासाठी जागा 'आरएलडीए'कडे (रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट ॲथरिटी) हस्तांतरीत करण्यात आली आहे.

आरएलडीएचे दिल्लीतील अधिकारी दीपक गुप्ता यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी आधी 'दमरे'कडेच बोट दाखवले. त्यानंतर मात्र तपासणी करून सांगतो, असे म्हणत प्रतिनिधीशी बोलणे टाळले.

भूमीपूजन सोहळ्याचा देखावा

औरंगाबाद शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून, अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. देशभरातील मॉडर्न रेल्वे स्थानकांमध्ये औरंगाबादेतील स्थानकाचाही समावेश आहे. त्या दृष्टीने गत बारा वर्षांपूर्वी पहिल्या टप्फ्यात प्रशस्त इमारत बांधण्यात आली. कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील इमारत व तिसऱ्या टप्प्यातील पार्सल विभाग, डाकघर यांच्या बांधकामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण प्रत्यक्षात सहा वर्षांचा काळ लोटल्यानंतर देखील येथे एक वीट रचली गेली नाही.

एकच प्रवेशद्वार उघडे असल्याने गर्दी, रेटारेटी सहन करत, चोरांना चूकवत प्रवाशांना जीव मुठीत धरून आत - बाहेर करावे लागते. पूर्वी साधे स्थानक होते तेव्हा तरी याची चांगली अवस्था होती. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले स्थानक माॅडर्न कमी 'गचाळ' जास्त असे झाली आहे.

नवी इमारत झाल्यानंतर समोरच्या भागात पॅथवे, पॅव्हरब्लाॅक बसवण्यात आले, मात्र चेंबरची उंची वाढवल्याने या ठिकाणी तळे साचलेले आहे. स्वच्छता देखील राहिलेली नाही. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मवरील व स्थानकाच्या परिसरातील कचरा जमा करून डस्टबिनमध्ये टाकला जातो. त्यात तो दिवसेंदिवस पडून राहतो. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते.

पर्यटन केंद्राची दुरावस्था

औरंगाबाद ही पर्यटननगरी आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी पर्यटन विभागाला रेल्वे खात्याने जुन्या इमारतीत दहा बाय दहाची खोली दिलेली आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हा कक्ष बंद असल्याचे येथील एका विक्रेत्याने सांगितले. या कक्षाच्या छताला गळती लागल्याने पाणी टपकत असल्याने तळे साचलेले आहे. यामुळे नव्या इमारतीत जागा द्यावी यासाठी 'दमरे'ला दहा वर्षांपासून पाठपुरावा चालू असल्याचे एमटीडीसीच्या सहायक मुख्य व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

रखडलेले अर्धवट सुशोभीकरण

रेल्वे स्थानकाच्या काही इमारतीही जुन्या झाल्या असून, त्यांची अवस्था बिकट आहे. नव्याने बांधलेल्या इमारती समोरील सुशोभीकरणाचे काम बारा वर्षांपासून रखडले आहे. आता बारा वर्षानंतर बजेट आल्यावर काम चालू करणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'दमरे'ने दोन एजन्सी नेमल्या आहेत. शासकीय रेल्वे पोलिस आणि आरपीएफ, शासकीय रेल्वे पोलिसांकडे 21 स्टेशनची जबाबदारी केवळ 42 कर्मचार्‍यांवर आहे. दुसरीकडे आरपीएफकडे रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून शासकीय पोलिसांना मदत करणे या जबाबदार्‍याही आहेत. आरपीएफमध्ये तीन अधिकारी व केवळ 24 जवान आहेत. यात नगरसोल ते बदनापूर अशी दहा स्टेशनची जबाबदारी आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती व रेल्वेच्या प्रॉपर्टीचे रक्षण करणे अवघड असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले.