Aurangabad

 

Tendernama

मराठवाडा

औरंगाबादेत ३६ लाखांचे सुरक्षा साहित्य नेमके गेले कुठे?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : भूमिगत गटार योजनेच्या (Underground Sewer Scheme) नावाखाली ३६५ कोटी रूपये खर्च करूनही शहरातील विविध भागातील ड्रेनेजलाइन (Drainage Line) तुंबत आहेत. सांडपाण्याच्या गटारी आणि मेनहोलमध्ये प्लास्टिकसह इतर कचरा साचत आहे. मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षासाधने खरेदीत देखील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची 'शाळा' सुरू असल्याचा प्रकार 'टेंडरनामा'ने उघडकीस आणला होता. त्यावर महापालिकेने या वर्षी ३६ लाखाचे स्वच्छता व सुरक्षा साहित्य खरेदी केल्याचा दावा केला आहे. असे असताना देखील पोटाची खळगी भरण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नालासफाई अथवा ड्रेनेज सफाईची कामे अजूनही सुरक्षा साहित्याविनाच करावी लागत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे सुरक्षा आणि स्वच्छता साहित्याला नेमके पाय कुठे फुटतात, या प्रश्नाचे उत्तर पालिका प्रशासकांनी शोधणे महत्त्वाचे आहे.

औरंगाबादकरांच्या तक्रारींची नोंद घेत महापालिकेतील वार्ड अभियंता मोठे काम असेल तर नोंदणीकृत कंत्राटदारांकडून आणि फुटकळ काम असेल अथवा केवळ चोकअपचे काम असेल तर जेटींग मशीन व्हॅनमार्फत सफाई कर्मचाऱ्यांकडून सफाई कामाचा सोपस्कार पाडतात. परंतु सफाई कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ते खरेदी केलेले साहित्य टेंडरमधील मानकाप्रमाणे कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. तसेच महापालिका अधिकारी देखील ऑक्सिजन पुरवठा संचासह इतर सुरक्षा साहित्य सफाई कर्मचाऱ्यांना देत नाहीत. यावर 'टेंडरनामा'ने वृत्त प्रकाशित केले होते.

३६ लाखांच्या साहित्याची खरेदी

महापालिकेने २०२१ - २२ या आर्थिक वर्षात ३६ लाख रूपयाचे साहित्य खरेदी केल्याचा दावा केला आहे. त्यावर खरेदी केलेले साहित्य कुठे आहे, या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी गोदामाचा दरवाजा उघडला, पण फोटो घेण्यास मात्र नकार दिला. यातूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या सुरक्षा साहित्य खरेदीत गौडबंगाल असल्याचा संशय बळावत आहे.

'कोविड' काळात केवळ १५ लाखांची खरेदी

कोविड संकटाच्या काळात २० मार्च २०२० पासून २०२१च्या अखेरपर्यंत महानगरपालिकेची आर्थिक स्थिती हलाखिची असल्याने स्वच्छता व सुरक्षा साधने खरेदीकरण्याबाबत वार्षिक निविदा प्रकाशित केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या काळात कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी एकंदरीत विनाटेंडर १५ लाखाचे साहित्य खरेदी केले होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यात ग्लोज, मास्क, टोपले, फावडे, झाडू, खराटे, गमबूट आणि विळे आदींचा समावेश होता. खरेदी केलेले साहित्य शहरातील ९ प्रभाग कार्यालयातील प्रभाग अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले होते. त्याची रितसर आमच्याकडे नोंद असल्याचे अधिकारी सांगतात.

कोविड काळानंतर जास्तीची खरेदी

कोविड परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर महापालिकेअंतर्गत कार्यरत कायमस्वरुपी अठराशे कर्मचाऱ्यांसाठी ३६ लाखाचे साहित्य खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर साहित्य त्या- त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वितरीत करण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले.

गणवेश, हिवाळी ब्लॅंकेटसाठी ७४ लाखांचा प्रस्ताव

स्वच्छता कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी नियमित गणवेशसाठी ३८ लाख व हिवाळी ब्लॅंकेटसाठी ३६ लाख असा एकंदरीत नव्याने ७४ लाखांचा प्रस्ताव महापालिका प्रशासकांकडे सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे साहित्य केवळ महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच देण्यात येते. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारामार्फत साहित्य मिळते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चार वेळा निविदा काढूनही पुरवठार मिळेना

महापालिकेतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना स्वच्छता व सुरक्षा साहित्य मिळावे यासाठी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान निविदा काढली होती. मात्र चार वेळा निविदा काढूनही पुरवठार मिळत नव्हता. अखेर पाचव्यांदा काढलेल्या निविदेत औरंगाबादेतील सिटीचौकातील यश ट्रेडिंग कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्याकडून ३६ लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले. यात १३ साधनांचा समावेश आहे. हॅन्डग्लोज, मास्क, लांबदांड्याचे खराटे, मोठे व छोटे टोपले, लोखंडी पंचा, गमबूट, सेफ्टी जॅकेट, ब्लॅक फिनाईल, व्हाईट ॲसिड, फावडे इत्यादी साहित्याचा त्यात समावेश आहे.