औरंगाबाद (Aurangabad) : मुकूंदवाडी रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढविण्यात आल्याने त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) नांदेड विभागाने येथे सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात आला. मात्र अल्पकाळातच येथील कामाचा बट्ट्याबोळ झाला असून, सुविधांच्या नावाने प्रवाशी बोंबाबोंब करत आहेत. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या सहाय्यक अभियंत्यांना संपर्क केला असता, कोरोनाचा काळ आणि रेल्वे ब्लाॅक करण्यासाठी परवाना मिळत नसल्याने विकासकामे रखडल्याचे ते सांगत आहेत. मात्र झालेल्या कामांचे टेंडर कधी काढले होते, कंत्राटदार कोण होता, याची माहिती दडवत, पुन्हा मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असल्याचे गाजर दाखवत आहेत.
२०१९ - २० च्या दरम्यान मुकूंदवाडी रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढविण्यात आला होता. या स्थानकाला ड-दर्जा देण्यात आला. त्याप्रमाणे येथे जानेवारी २०२० मध्ये तत्कालीन रेल्वे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांच्या काळात विशेष निधीतून दोन कोटी रुपये खर्च करून प्रवाशांना सुविधा देण्यात आल्या होत्या.
कोट्यवधींचा खर्च पाण्यात
- फलाटाची लांबी वाढवत त्यावर केलेल्या कॉंक्रिटच्या कामाला दोनच वर्षांच तडा गेला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या या कामाशेजारी असलेली फलाटावरील नविकोरी फरशी गायब झाली आहे. शिवाय संरक्षक भिंतीत गॅप ठेवल्याने फलाटात तळीराम आडवे पडलेले असतात. फलाटातील प्रवाशी निवाऱ्याच्या खाली जुगार अड्डे भरलेले दिसतात.
- येथे पाण्याची व्यवस्था नसताना बांधलेल्या कॉंक्रिटच्या पाणपोया कोरड्याठाक असून त्यातील तोट्या गायब झाल्या आहेत.
- धक्कादायक म्हणजे फलाटावर उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याखाली काॅक्रिटचे कट्टे न उभारता इतरत्र उभारण्यात आल्याने ते फक्त शोभेसाठी ठरले आहेत. तिकीट घराशेजारी बांधलेले प्रतिक्षागृह गेल्या दोन वर्षांपासून कुलूपबंद असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फलाटावर १७ पथदिव्याचे खांब रोऊन त्यावर बसवलेल्या दिव्यांची तोडफोड झाल्याने प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
- नव्याकोऱ्या प्रवेद्वाराला खिंडार पडले आहे. रेल्वे रुळाच्या विरुध्द बाजुला गजबजलेल्या नागरी वसाहती असून अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी गाडलेले लोखंडी राॅड गायब झाले आहेत. अडचणीत बांधण्यात आलेले प्रसाधनगृह देखील कुलूपबंद असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडलेली आहे.
- स्टेशनच्या फलाटावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे फलाटाच्या कोपऱ्यापासून ते काही अंतरापर्यंत लोखंडी बॅरिकेटस लावण्यात आले होते. मात्र काही लोकांनी ते काढून भंगारात विकल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वी काय झाले हे मला आता सांगता येणार नाही. पण आता मुकूंदवाडी रेल्वे स्टेशनचे सध्या सोळा डब्ब्यांचे फलाट हे २१ पर्यंत वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय एका बाजूने सरंक्षक भिंत तयार करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने काॅक्रिट गट्टू उभे करणार आहोत. याशिवाय फलाट वाढविण्याचे कामही लवकरच सुरू होईल. आता या रेल्वे स्टेशनवरील सुविधांचाही विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे.
- जनार्दन बालमूच , विभागीय सहाय्यक अभियंता, द. म. रेल्वे