Kavita Navande Tendernama
मराठवाडा

क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांचे निलंबन कधी?; राज्यपालांचे आदेश..

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : आर्थिक गैरव्यवहाराचा आणि सरकारची दिशाभूल केल्याचा ठपका असलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांच्या मार्फत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते. त्या आदेशानुसार नावंदे यांची औरंगाबाद प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे या चौकशी प्रकरणात सादरकर्ता अधिकारी म्हणून लातुर येथील क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशीत सारे काही स्पष्ट होत असताना अद्याप नावंदे यांना निलंबित न केल्याने यांच्यावर नेमका कुणाचा कृपार्शिवाद आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस त्यांची क्रीडा विभागाच्या विविध खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलाच्या उपसंचालक उर्मिला मोराळे, अमरावतीच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, पुण्याचे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ मध्ये प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती.

यासंदर्भात लातूरचे विभागीय क्रीडा संकुलाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी रितसर क्रीडा विभागाला पत्र लिहून नावंदेची चौकशी पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये करण्यात यावी व लातूर, पुणे,औरंगाबाद अंतर जास्त असल्यामुळे व अधिक वेळ जात असल्यामुळे पुणे विभागातूनच त्यांची चौकशी करण्यात आली होती. नावंदे यांची चौकशी निपक्ष:पाती व्हावी यासाठी चौकशी काळात त्यांना निलंबित करून चौकशी करण्यात यावी असे सातारा, अहमदनगर येथील सर्व क्रीडा संघटनामार्फत मागणी करण्यात आली होती.

असा आहे आरोप

कविता नावंदे यांच्याविरुद्ध दिगंबर वाघ या तक्रारदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याबाबत विनंती केली होती या पत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक असताना शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तसेच सातारा जिल्हा येथील स्वयंसिद्धाचे टेंडर स्वतः टाकून सरकारची दिशाभूल केली . सातारा प्रकरणामध्ये तर त्यांनी मी क्रीडा विभागाची कायम स्वरूपी कर्मचारी नसल्याचे थेट प्रतिज्ञापत्र दिले असून दुसरीकडे जिल्हा क्रीडा अधिकारी असल्याचे प्रमाणपत्र लावले आहे ते चुकीचे असून त्यात सहा वर्षाचा अनुभव असताना ते या जिल्हा क्रीडा अधिकारी पदास पात्र होवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी शासनाची दिशाभूल करून सरकारी सेवेत जबाबदार पदावर कार्यरत आहे.

नियमाला बगल

जिल्हा क्रीडा अधिकारी या पदासाठी एमपीएससी उत्तीर्ण अथवा सहा वर्षाचा अनुभव लागतो तो कालावधी नसताना खोटे सर्टिफिकेट लावून नोकरीस लागलेल्या आहे. क्रीडा खात्याचे ओएसडी स्वतःकडे असताना औरंगाबाद जिल्ह्यात बदली करून घेतली.अशा विविध प्रकरणाचे पुराव्यानुसार वाघ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र दिले होते. तसेच औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाची न्यायालयीन सुमोटो केस चालू असताना कविता नावंदेनी विभागीय क्रीडा संकुल येथील रात्रीमध्ये रूमच्या भिंती तोडून केबिन प्रशस्त स्वरुपात करून घेण्यात आली. नेहमी प्रमाणे यावेळेस देखील आपल्या सुखसोयींकडे लक्ष केंद्रित केले. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोणत्या कारणास्तव परवानगी दिली आहे असे औरंगाबाद क्रीडा जगतात कुजबुज सुरु आहे सुनील केंद्रेकर हे कविता नावंदे यांना काबर आश्रय देत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा सातारा,अहमदनगर येथे आर्थिक गैरव्यवहार आणि शासनाची दिशाभूलचा ठपका ठेवण्यात आलेले विभाग पुणे असताना नावंदेची चौकशी औरंगाबाद विभागात का घेण्यात आली असा संशयास्पद प्रश्न क्रीडा प्रेमी मनात निर्माण होत आहे.