Aurangabad tendernama
मराठवाडा

औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील वाॅटर व्हेंडिंग मशीन 5 वर्षांपासून बंद

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ किंवा विक्रेत्यांकडून पाणी बाटली खरेदी करण्यासाठी खर्च करावे लागणारे १५ ते २० रुपये, यापासून प्रवाशांची सुटका व्हावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ‘वॉटर व्हेंडिंग मशिन’ बसविले. मात्र दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएमने उद्घाटन केल्यानंतर या मशिनच्या सहाय्याने प्रवाशांना पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर थंडगार आणि शुद्ध पिण्याचे पाणी केवळ दोन दिवस मिळाले. २५ मे २०१७ रोजी केलेल्या उद्घाटनानंतर २७ मे २०१७ ते आजपर्यंत या मशीन बंद असल्याने त्या शो पीस ठरत आहे. या मशिन पुन्हा कार्यान्वित कधी होणार असा सवाल प्रवाशी करत आहेत.

औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन मशीन, प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर एक मशिन बसविण्यात आले होते. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) वतीने प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली  होती. सदर मशीन कार्यान्वित ठेवण्यासाठी हैद्राबादच्या वाॅटर हेल्थ या कंपनीला आयआरसीटीसीने टेंडरनुसार निवड केली होती. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून दररोज किमान ५० ते ६० हजार  प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाणपोईची व्यवस्था आहे. मात्र, तेथील अस्वच्छतेमुळे अनेक प्रवासी ते पाणी पिण्याऐवजी विक्रेत्यांकडील पाण्याची बॉटल विकत घेतात. अनेकदा विक्रेत्यांकडून खासगी कंपनीच्या अधिक किमतीच्या पाणी बॉटलची विक्री केली जाते. याशिवाय सर्वसामान्य, गरीब कुटुंबियांना पाण्याची बाॅटल घेणे परवडणारे नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर ३  वॉटर व्हेडिंग मशिन बसविल्या. मात्र केवळ या मशिन बसविण्याचे काम पूर्ण करत टेंडर काढून हैद्राबादच्या वाॅटर हेल्थ या कंपनीला काम दिल्याचा सोपस्कार पार पाडला गेला. उद्घाटनाच्था दोन दिवसानंतर मात्र कंपनीने मशीन सोडून पोबारा केला. नंतर प्रवाशांच्या सेवेसाठी मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला देखील विसर पडला. 

पालिकेच्या पाण्यावर होत होती प्रक्रिया

महापालिकेकडून रेल्वे स्टेशनला केल्या जाणाऱ्या पुरवठ्यातील पाण्यावर या मशिनद्वारे प्रक्रिया केली होती. त्यानंतर ते थंड करून प्रवाशांना उपलब्ध करून दिले जात होते. हे पाणी मशिन ऑटोमॅटिक चालत होते. तसेच, देखभालीसाटी ठेकेदार देखील नियुक्त केला होता. रेल्वे प्रशासनाच्या या सेवेमुळे प्रवाशांना दोन रूपयात ३०० मिली वाॅटर बोटलसह तीन रूपये, तीन  रुपयात अर्धा लिटर, डाॅ. वाटर बोटलसह पाच रूपये, पाच  रुपयात एक लिटर, डाॅ. वाॅटर बोटलसह आठ रूपये, आठ रुपयात दोन लिटर, वाॅटर बोटलसह १२ रूपये व वीस रूपयात पाच लिटर व वाॅटर बोटलसह ते पाणी २५ रूपयात  मिळत होते. ही सुविधा बंद पडल्याने प्रवाशांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शिवाय पाण्यासाठी खाजगी विक्रेत्यांकडुन मनमानी पध्दतीने विक्री होत असल्याने प्रवाशांना तृष्णा भागविण्यासाठी अवाजवी किंमत मोजावी लागत आहे.