छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मधोमध आणि वळणमार्गावर आडवे पडलेले, गंजलेले अन् उखडलेले पाइप आणि त्यातील रस्त्यात उघडे पडलेले खिळे, अशी सध्याची अवस्था बघून हेच काय स्मार्ट सिटीत समावेश झालेले शहर, असा प्रश्न पडतो.
छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्पोरेशनने शहरवासीयांना सायकल चालविण्यास वाव मिळावा, बेलगाम वाहतूक शिस्तीत यावी यासाठी सायकल ट्रॅक व वळणमार्गासाठी तब्बल तीन कोटी रूपये खर्च करून प्लास्टीक पाइप लावण्यात आले. मात्र स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाइप उखडून रस्त्यारस्त्यांवर खिळे उघडे
पडल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
कधी वाहनाचे टायर खिळ्यात अडकून पडेल व अपघात होईल याचा नेम नाही. अशा खिळेमय रस्त्यांमुळे चाक पंक्चर होणे ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना यानुसार अतिरिक्त खर्च वाढला आहे. भर उन्हात शहरातील हे चित्र कॅमेऱ्यात कैद करताना स्मार्ट सिटी कारभाच्यांची उदासीनता धोकादायक ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांनी व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीनगरकरांना सायकल सफरीचा आनंद घेता यावा, तसेच वळण मार्गावर बेलगाम वाहतुकीला चाप बसावा व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हे सायकल ट्रॅक आणि फूटपाथ बांधण्यात आले. सायकल ट्रॅक व वळणमार्गासाठी शहरातील काही मुख्य आणि वर्दळींच्या चौकात पाइप रोवण्यात आले. मुळात पाइप रोवले जात असताना नागरिकांनी याला प्रचंड विरोध दर्शविला होता. पण आता याच पाइपांचा वाहतुकीस अडथळा होत आहे.
संपूर्ण शहरात ट्रॅकचा बोजवारा उडाला आहे. काही ठिकाणी पाइप आडवे पडलेले आहेत. काही ठिकाणी कापून नेण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी पाइप उखडल्याने खिळे उघडे पडलेले आहेत.
यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वच मार्गावर जे काही पाइप उभ्या अवस्थेत आहेत. ते वाहनांच्या धुराने काळेकुट्ट झाल्यामुळे स्मार्ट सिटीची शोभा घालवली जात आहे याकडे कुठल्याही यंत्रणेचे लक्ष नाही.
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक भागात सायकल ट्रॅक रस्त्यालगत करण्यात आले होते. या मार्गावरून सायकल तर कधी गेलीच नाही. याउलट रस्त्यालगत असलेले सायकल ट्रॅक आज वाहतुकीला अडथळे निर्माण करत आहेत. त्यात सायकल ट्रॅकच्या दोन पाइपांमध्ये सौंदर्यीकरणासाठी कुठे टायराचा तर कुठे प्लास्टीक कुंड्यात केलेल्या वृक्षारोपणाचेही तीनतेरा वाजले आहेत.
स्मार्ट सिटी कारभाऱ्यांच्या अशा नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यांरस्त्यांवर वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो आहे. या ट्रॅकसाठी उभारलेले तात्पुरते प्लास्टिकचे पाइप एकेक करुन गायब होत आहेत. सर्वच भागात बहुंताश ठिकाणईइप उखडली आहेत. सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. उखडलेल्या पाइपातील खिळे उघडे पडल्यामुळे दुचाकी, तीन चाकी, चार चाकी गाड्यांच्या टायर पंक्चर होत आहेत.