औरंगाबाद (Aurangabad) : एक वेळ दुरुस्ती अंतर्गत प्रकल्पातून नगर नाका ते केंब्रिज स्कूल या एकूण १४ किमी रस्त्यासाठी ७३ कोटी दिल्याचा गवगवा करत या प्रकल्पाचा लोकार्पन सोहळा २४ एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gdkari) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जालना रस्त्यावर हे काम गत तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. झालेल्या कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. गडकरी यांनी सदर कामाचा आढावा न घेताच कामाचा लोकार्पन सोहळा आणि नियोजित कामांचे भूमिपूजन करू नये, असा सूर औरंगाबादमधील नागरिकांमधून उमटतो आहे. औरंगाबादकरांचा नाराजीचा हा 'गतिरोधक' गडकरी हे कसा पार करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी हे उद्या (ता. २४) औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पन सोहळा आणि भविष्यात होणाऱ्या काही प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजित दौऱ्याच्या निमित्ताने बीड बायपासरोडवरील जबिंदा मैदानावर लाखो रुपये खर्च करून सभामंडप आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यात गडकरींच्या हस्ते हे कार्यक्रम पार पडणार आहेत.
याच लोकार्पण सोहळ्यात एक वेळ दुरूस्ती अंतर्गत प्रकल्पातून ७३ कोटी खर्च करून नगर नाका ते केंब्रिज स्कूल या १४ किमी प्रकल्पाचा देखील लोकार्पन सोहळ्या पार पडणार आहे.
गडकरी यांच्या दौऱ्याची कुणकूण लागताच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुर्तिजापूर म्हाडा काॅलनी - मातोश्री लाॅन ते चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत १२१० मीटर अंतरावरील गत तीन वर्षांपासून रखडलेले साईड ट्रॅक आणि डांबरी रस्त्याचे काम एकाच वेळी घाईत काढल्याने औरंगाबादकरांना धुळीचा आणि वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. गडकरी यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामांचे लोकार्पन करू नये, त्याचबरोबर इतर कामांचे भूमिपूजन करू नये, असा सूर औरंगाबादकरांमधून उमटतो आहे. जिल्हा न्यायालयासमोरील लोखंडी ओव्हर ब्रीजच्या कामाची तपासणी करावी, अशीही मागणी समोर आली आहे.
औरंगाबाद शहरातील सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या असलेल्या जालना रस्त्याच्या कामासाठी हैदराबाद येथील सृष्टी काॅन्टेच प्रा. लि. या कंपनीची नेमणूक करण्यात आली. मंजुर झालेल्या ७४ कोटी ८८ लाखातून २.२१ कमी दराने त्याने टेंडर मान्य केल्याने ७३ कोटी २० लाख ४९ हजारात त्याला कामाचा ठेका देण्यात आला. त्याची रितसर वर्कऑर्डर १३ नोव्हेंबर २०१९ रोजी देण्यात आली होती. पण त्याने वर्क ऑर्डर हातात पडताच हे काम ३० ते ४० टक्के मोजत राजवीर, साईश्रध्दा, ब्लूलेडर व अन्य कंत्राटदारांना परसपर वर्क ऑर्डर देऊन कामे वाटून दिली. त्यांनी ही कामे निकृष्ट दर्जाची केल्यामुळे केंद्र शासनाच्या ७४ कोटी ८८ लाखाच्या कामांवर माती फिरली. त्यामुळे औरंगाबादकरांवर आगीतून फोफाट्यात येण्याची वेळ आली आहे.
अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, पीएमसी कोमात
एनएचएआयच्या अभियंत्यांना याबाबत 'टेंडरनामा'कडून विचारणा झाली असता त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला इतर कामांचा व्याप असल्याने या कामासाठी आम्ही दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून जयपूरच्या नरेंद्र पार्थसारथी यांच्या सीईजी कंपनीची प्रोजेक्ट मॅनेजमेंट समिती म्हणून नेमणूक केल्याचे सांगत येथील प्रकल्प संचालक अरविंद काळे तसेच अधीक्षक अभियंता डी.एम.पाटील यांनी हात वर केले होते. दरम्यान प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटीचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने या कामाची वाट लागली आहे. या कामामुळे मूळ कंत्राटदार मालामाल झाला असून, सब कंत्राटदारांची दिवाळी साजरी होत आहे. या सर्व प्रकारात औरंगाबादच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट दिसते आहे.
असे झाले कामांचे वाटोळे
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटाराचे, तसेच पेव्हरब्लाॅकचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दर्जा न तपासता थेट हे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जालना रोडवरील केंब्रिज चौक ते नगर नाक्यापर्यंत या गटाराचे, तसेच रस्त्याची रूंदी वाढवत त्यावर पादचाऱ्यांसाठी पेव्हरब्लाॅकचा फुटपाथ तसेच जिल्हा न्यायालय, मुकुंदवाडी येथे ओव्हर ब्रीज तयार करण्यात आले आहेत. एसएफएस स्कूल समोर काम अद्याप अर्धवट आहे.
१५० कोटींचा गडगडाट, प्रत्यक्षात दिले ७४ कोटी
या रस्ताच्या विस्तारीकरणासाठी गडकरी यांनी १ जून २०१८ ला दीडशे कोटींची योजना तयार केल्याची घोषणा केली होती. त्यात जालना रस्त्याचे सहापदरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा विकास आराखडा देखील एनएचएआयकडे सादर केल्याचे ते म्हणाले होते. २०१८ पर्यंत कामाची टेंडर निघतील, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद न झाल्यामुळे १५० कोटी ऐवजी ७४ कोटी ८८ लाख रुपयांना केंद्र शासनाने मंजुरी दिली.
या कामांचा समावेश
केंब्रिज चौक ते एअरपोर्ट तसेच नगरनाका ते महावीर चौक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, केंब्रिज चौक ते नगरनाका या १४.५ किमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने आरसीसी गटार आणि रस्त्याच्या उर्वरित शोल्डरमध्ये पादचाऱ्यांसाठी साडेतीन मीटरचा फुटपाथ तयार करणे. मुकुंदवाडी, एसएसएस तसेच जिल्हा न्यायालयासमोर पादचाऱ्यांसाठी लोखंडी ओव्हर ब्रीज तसेच चिकलठाणा जिल्हा रूग्णालय ते एअरपोर्ट ओव्हरब्रीज आदी कामांचा यात समावेश होता.
उड्डाणपूल रद्द, कोट्यवधींचा चुराडा
खासदार इम्तियाज जलील यांनी अखंड उड्डाणपुलाचा मुद्दा उपस्थित केल्याने उड्डाणपूल रद्द झाला. यात नव्यानेच केलेले रस्ते पोखरून आता लेव्हल जुळवत नव्याने चारपदरी रस्त्याचे काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूल होणार म्हणून महापालिकेने चार वर्षांपूर्वी विमाततळासमोर डीपीडीसीतून जवळपास ६० लाख रूपये खर्च करून तयार केलेले सुशोभिकरणाचा खर्च ही वाया गेला. त्यात रस्त्यांवर रस्ते तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशा आशयाची मागणी होत आहे.
गडकरींच्या लोकार्पन सोहळ्यापूर्वी 'टेंडरनामा'ची पाहणी
नगर नाका ते केंब्रिज स्कूल एकूण १४ किमी रस्त्याच्या कामाचा लोकार्पन सोहळा २४ एप्रिल रोजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी 'टेंडरनामा' प्रतिनिधीने या कामाची पाहणी केली त्याचा हा लेखाजोगा...
- केंब्रिज चौक ते एअरपोर्ट तसेच नगरनाका ते महावीर चौक दरम्यान केलेल्या डांबरीकरणाची वाट लागलेली आहे. त्याचा पुरावा म्हणजे तीन वर्षांत दोनदा उखडलेल्या कामावर पॅचवर्कची उंचवट्यांची लिपापोती केलेली दिसली.
- नगरनाका ते महावीर चौक, महावीर चौक ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते क्रांतीचौक ते अमरप्रीत ते मोंढानाका ते आकाशवाणी ते सेव्हनहील ते उच्च न्यायालया दरम्यान कुठे एक ते दीड मीटर पर्यंत झेब्राक्राॅसिंग गटारीचे काम झालेले दिसले. त्यावर काही भागात पॅव्हरब्लाॅक तर काही भागात मातीचे ढिग पसरलेले दिसले.
- या गटाराच्या भिंती बांधताना भिंती उभारण्यासाठी ठेवलेले साहित्य २१ दिवसांच्या आत काढल्यामुळे भिंतीच्या मजबुतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
- या कामाचा स्पाॅटपंचनामा करत असताना एअरपोर्टसमोर तसेच चिकलठाणा आठवडी बाजार समोर जालना रस्त्याच्या बाजूला गटाराचे हे काम सुरू असताना कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
- कामासाठी वापरलेले साहित्य उत्तम दर्जाचे नसल्याचे दिसून येत आहे. याच बरोबरीने अंदाज पत्रकाप्रमाणे कोणतेही काम येथे सुरू असल्याचे दिसून येत नाही. याउलट सरसकट लोखंडी सळ्यांची बांधणी करून त्यात काँक्रीट ओतल्याचे दिसते.
- गटारासाठी वापरण्यात आलेले काँक्रीट उत्कृष्ट दर्जाचे आहे का, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
- केंब्रिज चौक ते नगरनाका या १४.५ किमीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने आराखड्यात साडेतीन मीटरचे पेव्हरब्लॉक बसविने असा उल्लेख असताना जिथे जागा मिळेल तिथे जेसीबीच्या दात्यांनी जमीन कुरतडत ते बसवण्यात आले. पेव्हरब्लॉकचे काम करताना बांधणी घट्ट करण्यासाठी त्यावर केलेली काॅक्रीटची लाॅकिंग अनेक ठिकाणी उखडल्याने पेव्हरब्लाॅकचे अनेक भागात तूकडे पडल्याचे दिसते.
- जालना रोड बाराही महिने पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. यावर रिक्षा, दुचाकांची सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ तयार करण्यात येणार असल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या या फुटपाथवर सर्वत्र वाहनांनी कब्जा केल्याने नेमका हा कोट्यवधीचा फुटपाथ कोणासाठी, असा प्रश्न नागरिक आता विचारत आहेत.
- शिवाय ठिकठिकाणी नक्षीदार फुटपाथ तयार करण्याचे शिक्षण या अभियंत्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतले आहे, हा देखील संशोधनाचा विषय आहे. ही करदात्या जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
- या पेव्हर ब्लॉकमध्ये फटी असल्याने तेथे कचरा अडकून बसलाय तर दुसरीकडे माती आणि चिखल झालेला दिसत आहे. सफाई करताना तो कचरा बाहेर येत नाही. तर अनेक भागात या नवा कोऱ्या फुटपाथवर कचरा साचून घाणीचे दर्शन होत आहे. मातीचे ढिग तसेच पडून आहेत. शिवाय यावर डांबरी रस्ता देखील ओरबाडण्यात आला आहे.
जिल्हा न्यायालयासमोर स्काय वाॅकवर चालून दाखवा
याच निधीतून मार्गावर तीन ठिकाणी ३० कोटीच्या स्काॅय वाॅकचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्हा न्यायालयासमोर गत वर्षीच ब्लूलेडर कंपनीमार्फत नव्याने बांधलेला स्कायवाॅकवर जराही पाऊल टाकताच त्यावर व्हायब्रेशनने हादरे बसतात. शिवाय तो बेंड झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय पायऱ्यांचे जाॅईंट देखील निखळलेले आहेत. चुकीच्या ठिकाणी पण तसा फार ऊपयोगी नसणारा स्कायवाॅक व त्याच्या आधाराने जमा झालेले बेकायदेशीर फेरीवाले यांनी त्याच्या चढ उताराच्या बाजू गिळकृत केल्या आहेत. पदचाऱ्यांना चालण्यासाठी असलेल्या या स्काॅय वाॅकवर सर्वत्र कचरा आणि त्यात भिकाऱ्यांनी निवास केल्याने तो अडचणीचा व त्रासाचा झाला आहे.
जिल्हा न्यायालयासमोर निकृष्ट स्काॅय वाॅक तयार केल्याने ब्लूलेडर कंपनीचा ठेका रद्द करून मुकुंवाडीतील स्काॅय वाॅक तयार करण्याचे काम मुंबईतील निलेश आर्के यांच्या साईश्रध्दा इंजिनियरींग कंपनीला देण्यात आले होते. मात्र त्याचा उपयोग काहीनीं पोस्टरबाजीसाठी सुरू केला आहे.
आकाशवाणी चौकात देखील चुकीची जागा निवडल्याने प्रकरण न्यायालयात गेल्याने तेथील स्काॅय वाॅक एसएफएस समोर उभारण्याचे काम सुरू आहे.
तीन वर्षांपासून रखडले काम
'टेंडरनामा' प्रतिनिधीने या सर्व कामांचा आढावा घेतला असता तीन वर्षांत केवळ ७० टक्के काम झाल्याचे दिसले. त्यात एअरपोर्ट समोरील मातोश्री लाॅन ते जिल्हा रूग्णालय असे १२१० मीटरच्या फ्लाॅय ओव्हर ब्रीजचे काम रद्द झाल्याने नव्याने केलेले उंच रस्ते पोखरून त्यावर लेव्हल जुळवण्यासाठी नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसले. अनेक ठिकाणी साईड ड्रेन आणि फुटपाथचे काम देखील बाकी असल्याचे दिसत आहे.
कामाचा दर्जा तपासा, मगच लोकार्पण करा
सदर काम अत्यंत निकृष्ट झाल्याने गडकरींनी या रस्त्यावरील कामांचा दर्जा तपासावा मगच लोकार्पण करावे, अशी मागणी होत आहे. पेव्हर ब्लाॅकच्या कामासाठी बेडवर मुरूम आणि खडी ऐवजी मातीमिश्रित क्रशर टाकणाऱ्या या कंत्राटदारावर आरोपही झाला होता.
लोकार्पनापूर्वीच कसे आले केंद्रीय पथक
गेली तीन वर्षे निकृष्ट काम करणाऱ्या या ठेकेदारांवर ना एएमसीचा वचक ना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा वचक आहे. मात्र लोकार्पनाच्या आठ दिवस अगोदर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे गुणवत्ता व दक्षता पथक या कामाची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र कारवाई कोणतीच केली नाही. त्यामुळे लोकार्पन सोहळ्याच्या खर्च वसुलीसाठी कंत्राटदारावर दबाब टाकण्यासाठी हा सारा खटाटोप होता काय, संशय बळावत आहे.