Aurangabad Tendernama
मराठवाडा

निकृष्ट दर्जाच्या कामांची मालिका संपेना; कंत्राटदारांना अभय?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरात सरकारच्या अनुदानातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. ही विकासकामे करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, कामे चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा प्रकार प्रशासक असलेल्या अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलेल्या पाहणीत उघड झाला होता. त्यानंतरही कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट कामांची मालिका सुरूच आहे. 'टेंडरनामा'ने केलेल्या पाहणीत आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद शहरात नागरिकांना मुलभूत सुविधा पूरविण्याची जबाबदारी असणाऱ्या कंगाल महापालिकेत निधीचा तूटवडा असल्याचे नेहमीच रडगाणे गायले जाते. त्यामुळे शासनाकडे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांसाठी प्रस्ताव पाठवले जातात. शासनाने देखील औरंगाबादकरांची ओरड आणि पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन १५२ कोटीचा निधी दिला.

शासनाने दिलेल्या १५२ कोटींच्या निधीतून २० रस्त्यांच्या बांधकामाचे नियोजन केले. यातून काही रस्त्यांचे व्हाईट टाॅपिंग आणि काही रस्त्यांच्या डांबरीकरणाबरोबरच दुभाजक, फूटपाथ आणि भूमिगत गटारींचा देखील समावेश करण्यात आला. ही कामे महापालिका, एमआयडीसी आणि एमएसआरडीसीच्या वतीने कंत्राटदारांना देण्यात आली.

प्रशासकांकडून कंत्राटदारांची कानउघडणी

या विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा प्रकार स्वतः महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या पाहणीत २४ फेब्रुवारी रोजी उघड झाला होता. त्यावेळी एमआयडीसीच्या अखत्यारीत सुरू असलेल्या चिश्तीया चौक ते एमजीएम मार्गावरील दुभाजकात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा ठपका ठेवत पाण्डेय यांच्या आदेशाने कंत्राटदाराचे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे, तर यापुढे निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाहीत, निकृष्ट कामे केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी दिल्याने कंत्राटदारांचे धाबे दणालले होते.

या उलट औरंगाबादच्या जी.एन.आय.इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका बड्या कंत्राटदाराने महापालिकेच्याच अखत्यारित असलेल्या जळगाव रोड ते अग्रसेन चौक मार्गावरील दुभाजकाचे काम करताना टेंडरमधील अटीशर्तींना फाटा दिला. टेंडरमधील रकमेनुसार ३२४० रुपये रनिंग मीटर प्रमाणे सातशे मीटरच्या कामासाठी महापालिकेने २२ लाख ६० हजाराचा मोबदला देण्याचे नमूद केले होते. मात्र कंत्राटदाराने टेंडरमधील नियमाचा भंग केल्याने निकृष्ट कामाचा ठपका ठेवत त्याला प्रति रनिंग मीटर केवळ १३४० रुपयांप्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये दिल्याचा दावा यश इनोव्हेटीव्ह कंपनीचे बिपीन हटकर यांनी केला आहे.

निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर

दुभाजकाच्या कामाबाबत तक्रार आल्यानंतर 'टेंडरनामा'च्या प्रतिनिधीने तज्ज्ञांसोबत पाहणी केली. यावेळी दुभाजकामध्ये सिमेंट ऐवजी क्रॅशसॅन्ड आणि गिट्टीचा वापर झाल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे सेंटरलाईन मधून दुभाजकाची पाहणी केली असता त्यात अलाईनमेंट देखील योग्य नसल्याचे समोर आले. एका बाजूने उंच आणि दुसऱ्या बाजुने दुभाजक खाली गेल्याचे दिसते. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने दुभाजकाचा कोथळाच बाहेर पडला असून, अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. धक्कादायक म्हणजे दुभाजकात माती न टाकता यंत्रणा पसार केल्याने या दुभाजकाचा कचरा झाला आहे. त्याामुळे कंत्राटदारावर आता नेमकी काय कारवाई होते, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे.