Paithan Tendernama
मराठवाडा

पैठण तालुक्यातील 'या' रस्त्याचे भाग्य उजळणार! साडेआठ कोटींतून होणार...

टेंडरनामा ब्युरो

पैठण (Paithan) : पैठण तालुक्यातील शेवता ते कौडगाव दरम्यान अनेक गावे आणि वाड्या - वस्त्यातून जाणाऱ्या या रस्त्याच्या डांबरीकरण आणि पूल मोऱ्यांच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५०५४ या विशेष लेखाशिर्षाखाली साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेवता ते कौडगाव रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.

सदर रस्त्याचे काम बिडकीन येथील संजय ट्रेलर या कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले आहे. ट्रेलर यांनी २५ दिवसांपूर्वीच रस्त्याचे एक ते दीडफूट खोदकाम करून खडीकरण व मजबुतीकरून करून रोलरने दबाई केली आहे. तद्नंतर नैसर्गिक दबाईसाठी रस्त्याचे पुढील काम बंद केले आहे. येत्या पाच ते सहा दिवसात टप्प्याटप्प्याने पुढील डांबरीकरणाच्या लेअरचे काम सुरू करणार असल्याचे ट्रेलर यांनी सांगितले.

शेवता ते कौडगाव या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. शेवता पारू पिंपळवाडी फाटा, मुलानी वाडगाव, ७४ जळगाव, मानेगाव, दिन्नापूर, कौडगाव आदी गावातून हा राज्यमार्ग जातो.‌ गेल्या काही वर्षांपूर्वी सुमारे साडेआठ किलोमीटर कौडगाव रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. परंतु काही वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था होण्यास सुरवात झाली होती. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, रुग्णांचे हाल होत असत. खड्ड्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती.

शेवता - कौडगाव रस्त्यालगत अनेक गावे व वाड्या - वस्त्याअसून रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने रस्त्यावरील प्रवास जीवघेणा बनला होता. खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होत असल्याने अंदाज येत नव्हता दरम्यान अपघाताचे सावट पसरले होते. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने रस्त्यालगत पाण्याचे तळे तयार होते.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे  ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.  रस्त्यालगत सर्वत्र प्रचंड धुळीचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ आदींचा आमदारांसह प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.