छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्टेशन रोडच्या व सिडकोतील एमजीएमच्या मुख्य चौकांमधील वाहतूक बेटांच्या व्यवस्थेचा महापालिका प्रशासनाला विसर पडल्याने या वाहतूक बेटांच्या सौंदर्याला बाधा येत आहे. वास्तविक बघता शहराच्या सौंदर्यात या वाहतूक बेटांची महत्त्वाची भूमिका असते. पण महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या वाहतूक बेटांचे सौंदर्य लयास चालले आहे.
शहरात मुख्य चौकात बोटावर मोजण्याइतकी काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक बेटे आहेत. परंतु सध्या यातील प्रत्येक वाहतूक बेटांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या वाहतूक बेटांच्या व्यवस्थेकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे.
त्यात रेल्वे स्टेशनरोडवरील हाॅटेल वीट्स समोरील पुलकसागरजी वाहतूक बेटावरील वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या लिंबाच्या फांद्या महानगरपालिकेतील उद्यान विभागाकडून निश्चित केलेल्या कंत्राटदाराकडून छाटण्यात आल्या. मात्र छाटलेल्या फांद्याची टेंडरनुसार विल्हेवाट न लावता चौकातील वाहतूक बेटा समोरच टाकून तो पसार झाला. त्यामुळे चौकातील दोन्ही रस्त्यांतील तसेच स्टेशन रोडवरील वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.
एमजीएम चौकातील रस्त्याच्या मधोमध नाला दुरूस्तीचे काम एका कंत्राटदारामार्फत महापालिकेतील ड्रेनेज विभागातील कारभार-यांनी केले. नालीवरील नादुरूस्त ढापे बदलण्याचेही काम केले. मात्र जुने मोडकळीस आलेली ढापे वाहतूक बेटासमोर ठेवून कंत्राटदाराने निष्काळजीपणाचा कळस गाठला. दुसरीकडे उर्वरीत ढापे रस्त्यालगतच एका मोठ्या व्यापारी संकुलासमोर टाकुनी दिल्याने येथेही रहदारीला अडचण होत आहे.