Aurangabad Tendernama
मराठवाडा

'पाणीपुरवठा'चे प्रधान सचिव औरंगाबादेतील अधिकाऱ्यांवर का भडकले?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील अत्यंत गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नावर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी औरंगाबादेत दाखल होत बैठक घेऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या संथगती कारभारावर या बैठकीत जैस्वाल यांनी सुरवातीलाच नाराजी व्यक्त करत काम समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवला. तसेच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) अधिकाऱ्यांचीही चांगलीच कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

चाळीस वर्षांपासून आत्तापर्यंत अशी गंभीर दखल कुठल्याही नेत्याने अथवा अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. ४ मे रोजी 'औरंगाबादकरांचे पाणी पाणी रे; पुरवठा योजनाच तोट्यात, पालिकेचा दावा' या मधळ्याखाली 'टेंडरनामा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी केवळ ७० दिवस औरंगाबादकरांना पाणी मिळत असताना पाणीपट्टी ४५०० रुपये आकारली जात असल्याचे स्पष्ट केले होते. त्या तुलनेच इतर शहरात मुबलक पाणीपुरवठा केला जात असतानाही एवढी रक्कम आकारली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाने शुक्रवारी राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा व एमजेपीचे अधिकारी उपस्थित होते. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त प्रशासक रविंद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपा व एमजेपीचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व अजयसिंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या संथगती कारभारावर जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली. काम समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवत एमजेपीच्या अधिकाऱ्यांना शालजोडे मारत चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा बैठकीनंतर रंगली. त्यात मनपाच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजन शून्य कारभाराचा देखील समाचार घेत सूचना केल्या.

उत्तरेकडील वसाहतींची तहान भागविण्यासाठी हर्सुल तलावातून १० एमएलडी पाण्याची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादकरांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांना मनपा अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचे आदेश देत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून देण्याची जबाबदारी टाकली आहे.

पाण्याची गळती थांबवा

पाण्याची गळती थांबवण्यासाठी उगमापासून ग्राहकांच्या दारापर्यंत पसरलेल्या जलवाहिनींचे जाळे तपासा, त्यातील खराब झालेले एअर व्हाॅल्व्ह दुरुस्त करा अशी सूचना करण्यात आली. वाढीव पाणीपुरवठा योजनेतील संथगतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करा. त्यातील जलकुंभांच्या कामाची गती अधिक वाढवा, शहरातील काही खाजगी व सरकारी विहिरी ताब्यात घेऊन त्या त्या भागात पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढवण्याचे आदेश बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शहराची तहान भागवण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. या कामातील संथगती पाहून एमजेपीच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत कार्यकारी अभियंता अजयसिंग यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे समजते. एमजेपीच्या अधिकाऱ्यांचा कंत्राटदारावर कोणत्याही पद्धतीचा वचक नाही, असे म्हणत जैस्वाल यांनी दोन महिन्यांत दहा जलकुंभ तातडीने उभारण्याचे निर्देश दिले.

कारणे सांगू नका, कामे करा

शहरात जुन्या जलवाहिन्या असल्या तरी तातडीने नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू करा. आता कोणत्याही अडचणी सांगू नका आणि त्या ऐकल्या जाणार नाहीत, असा सज्जड दमही जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना भरला.