Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : एका बाजूने छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग ते दुसऱ्या बाजूने सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग या मध्यभागी शेंद्राबन - भालगाव या पाइप लाइन रस्त्यावरून आसपासचे शेकडो गावातील ग्रामंस्थ दररोज जा - ये करतात. रस्त्यालगत शेती असल्याने कामानिमित्त रस्त्याचा वापर करावाच लागतो. मात्र, शेकडो गावातील ग्रामस्थांची शेत आणि गावाकडे जाणारी वाट बिकट झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि आजारी रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
याबाबत 'टेंडरनामा'त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी यांनी तातडीने दखल घेत दोन्ही राष्ट्रीय महामार्गाकडे प्रतापगडाकडे जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि विशेषतः तीन दिवसांत साडेपाच किलोमीटर अंतरावर डांबरीकरणाचे काम संपवले आहे.
अनेक वर्षांनंतर रस्त्यावर डांबर पडल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेंद्राबन ते भालगाव हा रस्ता छत्रपती संभाजीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. तर छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गापर्यंत साडेपाच किलोमीटरचे अंतर आहे. पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून या रस्त्याला जोडणारी गावे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमुळे या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या टोलेजंग इमारती, गृहप्रकल्प साकार होत आहे.
मोठ्या प्रमाणात वसाहती उभ्या राहिल्या आहेत. याशिवाय पंचक्रोशीतील कामगारांची देखील या मार्गावरून दिवसरात्र रेलचेल असते. शेतमालाची आयात - निर्यात करण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. भालगाव, चितेगाव, आपतगाव, टाकळी शिंपी, सुंदरवाडी, झाल्टा, चिकलठाणा, गांधेली, सातारा - देवळाईकरांना देखील सोलापूर - धुळे हायवेकडून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत येण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे.
गेल्या अनेक आठ वर्षांपासून ग्रामस्थ, कामगार, विद्यार्थी व रुग्णांना खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या साडेपाच किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. रस्त्यावर डांबरच शिल्लक नसल्याने दगडगोटे बाहेर पडले होते. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत 'टेंडरनामा'ने वृत्त प्रसिद्ध करताच तिसऱ्याच दिवशी एमआयडीसीच्या संबंधित विभागाच्यावतीने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
पावसाचा अंदाज पाहून हे काम इतक्या युध्दपातळीवर करण्यात आले आणि तीन दिवसांतच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाने तत्परता दाखविल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. खराब रस्त्यामुळे जाणाऱ्या शेकडो गावातील ग्रामस्थांची अंगठेफोड होत होती. वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. वाहतूक पूर्ववत होईपर्यंत अनेकांची दमछाक होत होती. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या मिटली आहे.