gandheli Tendernama
मराठवाडा

Tendernama Impact : अखेर 10 वर्षांनंतर ग्रामस्थांची मागणी पूर्ण अन् रस्ता झाला गुळगुळीत

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीड बायपास ते गांधेली या ३ किमी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. रस्त्यावरून वाहने चालवणे तर सोडा, पायी चालणेही कठीण झाले होते.

यासंदर्भात टेंडरनामाने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी ४८ लाख ७१ हजाराचा निधीतून रस्त्याचे डांबरीकरण, मजबूतीकरण केले. यासंदर्भात गांधेली ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांसह ग्राम विकास अधिकाऱ्यांना मागील दहा वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तगादा सुरू होता. ग्रामस्थांच्या मागणीला 'टेंडरनामा'ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचे पाठबळ मिळाले.

गांधेली  ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या मागणीला यश आले. आमदार शिरसाट यांनी पाठपुरावा करून रस्त्याच्या बांधकामासाठी १ कोटी ४८ लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून आता रस्ता गुळगुळीत झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधेली हा रस्ता जुना बीड बायपास ते नवीन बीड बायपास - सोलापूर - धुळे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडतो. दरम्यान काही वर्षांपूर्वी सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना गावातील या छोट्या रस्त्यावरून बांधकाम साहित्याच्या अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची पार चाळणी झाली होती. त्यामुळे गांधेली येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित कंत्राटदाराकडून रस्ता दुरुस्तीची मागणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र सदर कामाच्या अंदाजपत्रकात तशी तरतूद नसल्याचे म्हणत अधिकाऱ्यांनी हात वर केले होते.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राम विकास अधिकाऱ्यांनी साकडे घातले होते. मात्र मध्यंतरी कोरोना काळ आणि पुढे संबंधित विभागाकडे तीनशे कोटी कंत्राटदारांचे आधीच देणी बाकी असल्याने व याकामासाठी निधीच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी गांधेली ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार शिरसाट यांच्याकडे केली होती.