छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मागील तेरा वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५२ छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील टाकळी शिंपी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर साततत्याने मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी व अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी एक कोटी ८४ लाख ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील कंत्राटदार जाॅनी शेख यांनी १५ टक्के कमी दराने टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याने त्यांच्या अमन कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. आता या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने अनेकांची खड्डे आणि डाबक्यातून सुटका होणार आहे. याशिवाय परिसरातील दळणवळणासह आता विकासाला चालना मिळणार आहे. या रस्ते कामाचा शुभारंभ माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या दक्षिण - उत्तर भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या व एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५२ छत्रपती संभाजीनगर - जालना व दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - एच - ५२ सोलापूर - धुळे यांना जोडणारा महत्त्वाचा टाकळी शिंपी या रस्त्याची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते.
या रस्त्याचे तेरा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत ७२ लाख १० हजार इतक्या रकमेचे टेंडर काढून काम झाले होते. मात्र नगरच्या किरण पागोरे या कंत्राटदारामार्फत या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम झाल्याने रस्त्यावरील डांबर काही वर्षांतच गायब झाले होते. सदर कंत्राटदाराकडे पाच वर्षासाठी देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असताना, त्याने त्याकडे कानाडोळा केला होता.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कार्यकारी अभियंता व कंत्राटदारांच्या हातमिळवणीमुळे भ्रष्टाचाराच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडले होते. गत अनेक वर्षापासून टाकळी शिंपी येथील ग्रामस्थ मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून द्यावी, अशी मागणी करत होते. मात्र अधिकारी व कंत्राटदार कंपनीने मात्र हातवर केले होते.
शेवटी या रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली होती. प्रतिनिधीने शहरापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या टाकळी शिंपी या गावात जाऊन रस्त्याची पाहणी केली होती. स्वतः: दुचाकीवर प्रवास करत खड्ड्यांचा अनुभव घेतला होता. दरम्यान ग्रामस्थांनी निदान मुरूम टाकून तात्पुरता रस्ता बनविण्यात यावा, असा टाहो फोडला होता. या रस्त्याची अवस्था पाहता टाकळी शिंपी रस्त्याला कुणी वालीच राहिलेला नसल्याचे निदर्शनास आले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दक्षिण - उत्तर भागातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा टाकळी शिंपी दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडला जातो. विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदींची सतत वर्दळ असते. मात्र या रस्त्याला कोणी वालीच नसल्यामुळे रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले होते.
ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते. ग्रामस्थांना दुसरा पर्यायच नसल्यामुळे याच मार्गावरून ये-जा करावी लागते. तर सायकलस्वार, दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने यांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत असत. यामुळे वाहनधारकांना पाठीचे आजार जडले होते.
टेंडरनामाने या रस्त्यांसंदर्भात वाचा फोडली. रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी सातत्याने मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे तगादा लावला होता. त्यानंतर फुलंब्री मतदार संघाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यापुढे देखील या महत्वाच्या रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत एक कोटी ८४ लाख ७४ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला.
गत महिन्यात या रस्त्याचे टेंडर काढण्यात आले. १५ टक्के कमी दराने टेंडर भरल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील अमन कंन्स्ट्रक्शन कंपनीचे जाॅनी शेख यांना हे काम देण्यात देण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता या रस्त्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या चेहर्यावर समाधान झळकत आहे.
येत्या दोन महिन्यांत रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे कंत्राटदाराने 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.