छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) : नितीन गडकरींच्या स्वप्नातल्या अमेरिकेसारख्या धुळे - सोलापूर, पालफाटा ते फुलंब्री ते खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर ते फर्दाफुर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाची दोनच वर्षांत ढासळलेली अवस्था पाहून पालफाटा ते चिखली आणि छत्रपती संभाजीनगर ते पैठण या नव्याने होत असलेल्या दोन राष्ट्रीय महामार्गांची अवस्था अशीच होणार का? विशेष म्हणजे दोन्ही रस्त्यांचे ठेकेदार जालन्याचे व्ही. पी. शेट्टी यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंधुचीच भागीदारी आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी सर्वांत कमी टक्के दराने टेंडर भरल्याने त्यांना लाॅटरी लागलीय. त्यामुळे इतक्या कमी टक्के दराने या रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गाच्या मापदंडानुसार दर्जेदार काम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुळे - सोलापूर मार्गावरील तिसरा टप्पा आडगाव ते करोडी एनएचएआयने तयार केलेला हा ६१३ कोटीचा नवीन बीड बायपास अनेक ठिकाणी कुरतडला गेला. धक्कादायक बाब म्हणजे धुळे - सोलापूर मार्गातील चौथा टप्पा करोडी ते तेलवाडी या ५५ किमी रस्त्यासाठी ५६५ कोटी रुपये खर्च केले गेले. दिलीप बिल्डकाॅन या कंत्राटदाराला कामाचा ठेका देण्यात आला होता. करोडी ते फतियाबाद दरम्यान रेल्वे ओव्हरब्रीज बांधण्यात आला होता. मात्र दीड वर्षातच तो खचला. एकूणच तांत्रिक दृष्ट्या या रस्ताचा दर्जा ढासळला गेला. पालफाटा ते फुलंब्री - खुलताबाद या राष्ट्रीय महामार्गाचे देखील दोनच वर्षांतच तीनतेरा वाजले. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाची देखील फारशी समाधानकारक अवस्था नाही.
त्यात आता सर्वात कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या जालन्याच्या व्ही. पी. शेट्टी व बी. एम. दानवे व इतर जाॅईंट व्हेंचर असणाऱ्या एकाच कंत्राटदाराला एनएचएआयने निश्चितच केलेल्या छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने निश्चित केलेल्या पालफाटा ते चिखली या दोन रस्ते राष्ट्रीय महामार्गांची कामे मानकाप्रमाणे होतील काय, असा प्रश्न 'टेंडरनामा'च्या शोधमोहिमेत उपस्थित होत आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग व एनएचएआयकडे तशी विचारणा केली असता नुकतीच गडकरी यांनी पैठण रस्त्याची पाहणी केली आहे. त्यांनी कामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड दिसली तर कडक शिक्षा भोगावी लागेल असे फर्मान काढले आहे. त्यामुळे काम चांगलेच होणार, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) ४९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या रस्त्याच्या कामाचे टेंडर प्रसिध्द झाल्यानंतर जालन्याच्या व्ही. पी. शेट्टी आणि कंपनी या कंत्राटदाराने सर्वात कमी ४१ टक्के कमी दराने टेंडर भरल्याने त्याला २८९ कोटी रुपयांमध्ये रस्ता तयार करण्याचे टेंडर भरले. त्यामुळे याच कंत्राटदाराला हा रस्ता कामासाठी देण्यात आला आहे. अंदाजपत्रक ४९० कोटी रुपयांचे प्रत्यक्षात रस्त्यांचे काम २८९ रुपयांमध्ये कसे होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आतापर्यंत एनएचआयने तयार केलेले कॅम्ब्रिज ते नगरनाका, धुळे - सोलापूर पालफाटा ते फुलंब्री ते खुलताबाद या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा ढासळला आहे. तांत्रिक दृष्ट्या रस्त्यांचा दर्जा घसरला आहे. त्यात ४९० कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होईल का, अशी विचारणा संबंधित विभागांना केली जात आहे.
पालफाटा ते चिखली या ३७.३६ किलोमीटर लांबी आणि १० मीटर रुंदीसाठी ३५० कोटी ७५ लाखाचे अंदाजपत्रक राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केले होते. हे काम देखील जालन्याच्या व्ही. पी. शेट्टी आणि कंपनीला देण्यात आले. याकामात देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाऊ बी. एम. दानवे भागीदार आहेत. त्यांनी या कामाचे टेंडर देखील ४१ टक्के कमी दराने भरल्याने त्यांना काम देण्यात आले आहे. याकामासाठी त्यांना २९ मार्च २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या पूर्वेकडे पालफाटा ते चिखली असा हा महामार्ग आहे. या रस्त्यामुळे चिखली, दाभाडी, तळेगाव, पीरबावडा, रिधोरा, कोलते टाकळी, पिंपळगाव, डोंगरगाव कवाड ते पालफाटा यागावातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. यारस्त्याचा डीपीआर मुंबईच्या आकार अभिनव कंपनीने तयार केला आहे. दरम्यान दाभाडी , तळेगाव, चिखली, पीरबावडा या गावांपर्यंत चारपदरी सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे. उर्वरीत तीन ते चार किलोमीटर अंतरात दोन पदरी रस्ता तयार केला जाणार आहे.
यामहामार्गावर टोलनाक्याचा देखील समावेश केला जाणार आहे. मात्र या रस्त्याबाबत देखील पैठण रस्त्याप्रमाणेच चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे नुकतेच १५४ कोटींच्या सिल्लोड बायपासचे टेंडर अपलोड झाले. त्यातही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निकटवर्तीयांनी टेंडर भरले. त्यातही नेहमीचा शुभ आकडा ४१ टक्के कमी दराने सहभाग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे काम देखील याच ठेकेदाराच्या पदरात पडणार असल्याची चर्चा राष्ट्रीय महामार्ग विभागात सुरू आहे.