Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बसस्थानकांचा विकास कधी होणार?; ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, ना एसटी महामंडळाचे!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्याची विभागीय तथा जागतिक पातळीवरील ऐतिहासिक राजधानी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको, मध्यवर्ती बसस्थानक व गेल्या दशकांपासून बंद पडलेले शहागंज बसस्थानक असुविधांचे स्थानक अन् कचऱ्याचे आगार बनलेले आहे.

शहरातील सर्वच बसस्थानकांमध्ये अस्वच्छतेचा कळस गाठलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत तीन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग जमिनीच्या दिशेला झुकलं आणि थेट बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला. या दुर्घटनेत जवळपास १२० पेक्षा जास्त नागरीक ढिगाऱ्याखाली दबले होते. ढिगाऱ्याखालून ८५ जखमींना बाहेर काढलं. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच मोठमोठ्या गाड्यांचं नुकसान झालं. ६६ पेक्षा जास्त रुग्णांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर तरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकांचे स्ट्रक्चर ऑडीट करून ते पाडून नव्याने बांधकाम करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले शहर आहे.राज्यातील महत्वाच्या शहरांपैकी प्रमुख शहर आहे.आणि मराठवाडयातील आठ जिल्ह्यांचे मुख्यालय म्हणजेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, बाजारपेठ औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर म्हणून जागतिक पातळीवर शहराची नोंद आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात कोर्टकचेरी, सरकारी कामे तसेच पर्टनाच्या दृष्टीने लाखाे पर्यटक, नागरिक शहरात येतात.पर्यटक व नागरिकांची वाहतूक एस.टी. बसेसमधून हाेत असते.‌यासाठी पर्यटक व नागरिक सिडको तसेच मध्यवर्ती बसस्थानकात येतात. मात्र, येथे साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवासी, भाविकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. त्यात गत दहा वर्षांपासून बंद पडलेल्या शहरातील शहागंज बसस्थानकाची स्थिती पाहता स्मार्ट सिटीला लाजवेल अशी त्याची कहाणी आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी वार्षिक कोट्यावधी रूपयांचे टेंडर काढले जातात. अधिकाऱ्यांच्या "हात" हा खालच्या कंत्राटदारांना स्वच्छतेची कामे दिले जातात.त्यामुळे वेळाेवेळी स्वच्छता केली जाते, असा दावा करणारे एस.टी. प्रशासन प्रवासी पर्यटकांच्या आराेग्याबाबत किती काळजीवाहू आहे, याचीच प्रचिती येथे साचलेल्या कचऱ्यावरून येते.टेंडरनामाने सलग दोन दिवस शहरातील बसस्थानकांची पाहणी केली असता, बसस्थानकांच्या आजूजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. विशेष म्हणजे मध्यवर्ती बसस्थानकामागील बाजूस मृत श्वान आढळून आला. गेल्या दाेन दिवसांपासून हा श्वान मृतावस्थेत पडून राहिल्याने माेठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांवर नाकावर रूमाल ठेवूनच या ठिकाणाहून जाण्याची नामुष्की ओढावली आहे. यासंदर्भात बसस्थानकातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही नियमित स्वच्छता करताे, असे उत्तर देऊन त्यांनी काढता पाय घेतला. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसविण्यात आली आहे. मात्र, टाकीखाली प्रचंड कचरा साचला आहे.

शहागंज बसस्थानकाची परिस्थितीही यापेक्षा फार वेगळी नाही. शहरातील पहिले बसस्थानक म्हणून या बसस्थानकाकडे पाहिले जाते. मात्र गत दहा वर्षांपासून हे बसस्थानक बंद पडलेले आहे. २०१३ मध्ये वीस लाख रूपये खर्च करून बसस्थानकाचे नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र बंद अवस्थेत असलेल्या बसस्थानकात कचरा डेपाे असेच येथील चित्र आहे. मध्यवर्ती व सिडको बसस्थानकातील स्वच्छतागृहाची तर इतकी गंभीर समस्या आहे की, लाेकांना येथे रात्री अर्धा-एक तास थांबणेसुद्धा मुश्कील हाेते. कारण तेथून येणाऱ्या वासामुळे नागरिक उभेच राहू शकत नाही. रात्री थांबणाऱ्या प्रवाशांनी तक्रार केली तर संबंधितांनी हे आमचे काम नाही, सकाळी येऊन साहेबांना भेटा सांगा, असे उद्धट उत्तर दिले. त्यामुळे या बसस्थानकांवर एसटी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असताना त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र पूर्णत: दुर्लक्ष आहे. मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यासाठी एसटी प्रशासनाने काेट्यवधी रुपयांचे टेंडर काढले. सविस्तर विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी सिडको बसस्थानकात बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ मध्ये सिडकोत बसपोर्ट उभारण्यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला. टेंडर काढण्यात आले. कंत्राटदाराची निवड करण्यात आली. मात्र अद्याप बसपोर्टचे काम मार्गी लागले नाही.

मध्यवर्ती बसस्थानकाचे नुतनीकरण करण्यासाठी १९ कोटीचे टेंडर काढण्यात आले होते.कंत्राटदाराची देखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पुढे महानगरपालिका आणि एसटी प्रशासनाच्या बांधकाम परवाना शुल्कावरून वाद निर्माण झाला आणि याचा फटका बांधकामावर बसला. पुढे कंत्राटदाराने बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याचे म्हणत टेंडर रकमेत वाढ करण्याची अट घातली. एकीकडे महानगरपालिकेने दिड कोटी रूपये बांधकाम शुल्क भरण्याबाबत एसटी प्रशासनाकडे तगादा लावला. दुसरीकडे कंत्राटदाराने टेंडर रक्कम वाढविण्यासाठी तगादा लावला शेवटी एसटी प्रशासनाने‌ टेंडर रद्द केले.पुढे शहागंज बसस्थानकात बीओटी तत्वावर वाणिज्य संकुल उभारण्याचा निर्णय देखील मागे पडला. कायमस्वरूपी बसस्थानकांची दुरवस्थाकडे एसटी महामंडळाची सपशेल डोळेझाक सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा येत्या १ जुन रोजी ७४ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या ७४ वर्षाच्या कालावधीत 'एसटी' चा कालानुरूप सेवेत बदल केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एकेकाळी शहागंज आणि रेल्वेस्टेशन स्थानकातून बस धावत होत्या.मात्र रेल्वेस्टेशन येथील जागा रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर शहागंज पाठोपाठ तेही बसस्थानक बंद पडले. त्यानंतर शहरात मध्यवर्ती, तर कधी सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याच्या बाता फोल ठरल्या. राज्यात 'लालपरी' म्हणजे साधी बस, निमआराम बससोबतच शिवनेरी बरोबर वातानुकूलित शिवशाही बस दाखल झाली असून 'एसटी' खाजगी बससेवेला चांगलीच टक्कर देत असली, तरी शहराचा वाढता व्याप पहाता बसस्थानकांचे नुतनीकरण आणि बसस्थानकांचा व्याप वाढविण्याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.‌ एसटी महामंडळाची सुरुवात १९४८ मध्ये झालेली असली तरी मराठवाडा हा निजामाच्या जोखडात असल्याने तेव्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात निजाम स्टेट रेल्वे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट या नावाने प्रवासी वाहतूक चालविण्यात येत होती. १९६० मध्ये मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा सुरू झाली. त्यावेळी मराठवाड्यात पाच जिल्हे होते.आता आठ जिल्हे आहेत.जिल्ह्याचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर होते. त्यावेळी रेल्वेस्टेशन आणि शहागंज येथे बसस्थानक होते. .

११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले. तेव्हापासून तर २०१८ या कालावधीत 'एसटी' ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री ही आठ आगार आहेत. साधी बस, निमआराम बससोबतच अत्याधुनिक सेवाही सुरू आहेत. यात 'शिवनेरी' बरोबर वातानुकूलित शिवशाही आणि स्लीपर बसही दाखल झाली. प्रवासी वाहतूक क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेत एसटी महामंडळ दमदार वाटचाल करीत आहे. विभागीय कार्यशाळा व चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा कार्यरत आहे. मध्यवर्ती कार्यशाळेत जुन्या 'एस. टी.' च्या पुनर्बांधणीसह स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी) 'एसटी'ने आकार घेत आहे. मात्र एकीकडे प्रगतीची वाटचाल करणाऱ्या एसटी प्रशासनाने एअरपोर्टच्या धर्तीवर मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची पाच वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती; टेंडर प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. असे असताना बसपोर्ट उभारणीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी सिडको बसस्थानकात बसपोर्ट उभारणीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.शहरात सातारा -देवळाई, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, पडेगाव, मिटमिटा, नारेगाव, चिकलठाणा, हर्सुल, ब्रिजवाडी याशिवाय शहर परिसरातील १८ खेड्यांसाठी महानगर प्राधिकरण नेमण्यात आले. शहराचा आवाका चहु बाजूंनी सातपुडा पर्वतरांगांना धडकत असताना इतक्या मोठ्या शहरासाठी केवळ दोनच आणि पुरेशा मुलभुत सोयीसुविधा नसलेले बसस्थानक कमी पडत आहेत. त्यामुळे बसस्थानकांची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे.