Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

SmartCity: अति'स्मार्ट' कारभार; 1 हॉस्पिटलचे काम जोमात अन् 3 कोमात

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटी अभियानातून शहरात चार पैकी केवळ एकाच मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलचे काम जोमात सुरू आहे. इतर तीन हाॅस्पिटल्सच्या बांधकामासाठी निश्चित केलेल्या जागांवर पाया देखील खोदला गेला नाही.

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे, तर दुसरा अधिकारी रस्त्यांचे बजेट फुगल्याचे सांगतो आहे. खोलात जाऊन या प्रकरणी तपास केला असता स्मार्ट सिटी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच काम रखडल्याच्या धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. यामुळे ठेकेदाराला (Contractor) मोठा फटका बसला असून, त्याला मनस्ताप सोसावा लागत आहे.

ठेकेदाराने इतर तीन ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती बांधकामासाठी लोकेशन फायनल करण्याबाबत स्मार्ट सिटी प्रशासनाला सहा ते सात पत्रे दिली. मात्र अद्याप त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली. जर लोकेशनच अंतिम झाले नव्हते, तर मग टेंडरमध्ये जागांची निश्चिती कशी काय करण्यात आली, टेंडर कसे काढण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता आधीचे टेंडर काढून दीड वर्षाचा कालावधी उलटला. जुन्या आणि नव्या दरसूचीनुसार बांधकाम साहित्यात १२ टक्के वाढ झाल्याने ठेकेदाराने पुढील तीन ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी दरवाढ द्या अथवा टेंडरच रद्द करा, असा तगादा स्मार्ट सिटीकडे लावल्याचे समोर आले आहे.

शहरात महापालिकेची पाच रुग्णालये, ३९ आरोग्य केंद्रे, १० ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू आहे. पूर्वीच्या तूलनेत शहराची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोना काळात रुग्णालयांची उणीव मोठ्या प्रमाणात दिसून आली होती.

शिवाय महापालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसल्याने व शहरातील घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयांचा भार कमी व्हावा, यासाठी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पांण्डेय यांनी स्मार्ट सिटी कार्पोरेशनमार्फत चार ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल उभारण्याचा चांगला निर्णय घेतला होता. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरभर कौतूक झाले होते. यात अत्याधुनिक सोयीसुविधा, तज्ज्ञ डाॅक्टर, प्रत्येक रुग्णालयात ६० बेड आदींचा रुग्णालयात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ३१.६२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.

हॉस्पिटलच्या बांधकामासाठी स्मार्ट सिटीमार्फत टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्या होत्या. त्यात दहा टक्के कमी दराने भरलेली हायटेक इन्फ्राटेक कंपनीचे टेंडर अंतिम करण्यात आले होते. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातून शहरात चार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ठेकेदाराने १०.३५ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने यात स्मार्ट सिटीचे दोन कोटी रुपये वाचले होते.

मात्र, सिडको एन-७ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना स्मार्ट सिटी कारभाऱ्यांनी या जागेचा टेंडरमध्ये समावेश केला. सिडको एन-२ व सातारा परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ज्या जागा टेंडरमध्ये दाखवण्यात आल्या, त्या जागा अंतिम करण्यात आल्या नाहीत. केवळ हडको एन-११ महानगरपालिका वार्ड कार्यालयालगत एकाच मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे काम सुपरफास्ट सुरू आहे.

इतर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी दीड वर्षात जागेचा गुंता न सुटल्याने अद्यापही ही रुग्णालये कोमात आहेत. यासंदर्भात ठेकेदाराने स्मार्ट सिटी प्रशासनाकडे जागा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलाही रिप्लाय दिला जात नाही. त्यामुळे ठेकेदाराने सिडको एन-११ इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर पुढील इमारतींचे टेंडर रद्द करण्याबाबत स्मार्ट सिटी प्रशासनाकडे तगादा लावला आहे.

भविष्यात जागा निश्चिती झाली किंवा पर्यायी जागांवर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलच्या इमारती बांधण्याचा निर्णय झाला तरी स्मार्ट सिटीला रिटेंडर काढावे लागेल. अन्यथा संबंधित ठेकेदाराकडून काम करून घ्यावयाचे असल्यास त्याने यापूर्वीचे टेंडर १०.३५ इतक्या कमी टक्के दराने भरलेले आहे.

आता जुन्या दरात त्याला काम परवडणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पूर्वीचा दरसूची आणि आत्ताची दरसूची यात १२ टक्के वाढ झाल्याने किमान दोन ते अडीच कोटी रुपये स्मार्ट सिटी प्रशासनाने वाढवून दिल्यास बांधकाम करणे शक्य होईल, असे ही ठेकेदाराने स्पष्ट केले आहे.