लातूर (Latur) : येथील मराठवाडा कोच फॅक्टरीतून वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर (शयनयान) डब्यांसाठी प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये १९२० डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ‘किनेट’ या कंपनीसोबत रेल्वे बोर्डाचा करार झाला आहे.
यात सात वर्षांत १९२० डबे तयार करणे तसेच पुढील ३५ वर्षे डब्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची असणार आहे. नुकतेच या कामाचे उद्घाटन झाले आहे. येत्या काही महिन्यांत वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रोटोटाइप तयार केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात डब्यांच्या उत्पादनाला सुरुवात होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी येत्या तीन महिन्यांत वंदे भारत एक्स्प्रेसच्या शयनयान डब्यांची चाचणी होईल, असे जाहीर केले होते. सध्या चेन्नई येथील ‘आयसीएफ’ येथे वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर डबे तयार करण्याचे काम सुरू आहे. लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरीत देखील वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसचे उत्पादन होणार आहे. त्यासाठीच ‘किनेट’ या खासगी संस्थेशी करार करण्यात आला.
लातूर येथील फॅक्टरीत सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी आधुनिक मशिनच्या साहाय्याने डब्यांचे उत्पादन केले जाणार आहे. लातूर येथील मराठवाडा रेल कोच कारखाना ३५१ एकरमध्ये बांधण्यात आला आहे. याठिकाणी सुसज्ज ११ प्रगत असेंब्ली स्टेशन बनविण्यात आले आहेत. तसेच कार बॉडी शॉप, वेअरहाऊस, असेंब्ली, टेस्टिंग, बोगी आणि पेंट शॉपसह विविध कार्यशाळा तयार करण्यात आल्या आहेत. कारखान्याच्या अंतर्गत ८.६ किलोमीटर लांबीचा ट्रॅक आहे.
कोच फॅक्टरीमध्ये डबे तयार करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सज्ज आहे. लवकरच प्रोटोटाइपचे देखील काम सुरू होईल. ‘किनेट’ कंपनीवर डब्यांचे उत्पादन आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसा करार झाला आहे.
- अभिषेक मिश्रा, जनसंपर्क अधिकारी, मराठवाडा कोच फॅक्टरी, लातूर