Aurangabad Tendernama
मराठवाडा

महावितरणच्या अधीक्षक, कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी सलग दोन महिन्यांपासून गेल्या दोन महिन्यांपासून महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा चांगलाच पर्दाफाश करायचे काम सुरू केले आहे. अचूक रिडींगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रिडींग घेणे आदी प्रकार दिसून आल्यामुळे याआधी ४६ एजन्सींना बडतर्फ केल्यानंतर आता पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, बीड व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा चार मीटर रिडींग एजन्सींना १० जुलै रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मीटर रिडींग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत बडतर्फ केल्या.

औरंगाबाद परिक्षेत्राअंतर्गत सर्व मीटर रिडींग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची १० जुलै रोजी बैठक आयोजित केली होती. यावेळी संचालक (संचालन) संजय ताकसांडे, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता व औरंगाबाद परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रकाश जमधडे उपस्थित होते.

बैठकीत अधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचताच संबंधित ४ एजन्सींना तडकाफडकी बडतर्फ केले. पाठोपाठ याचवेळी महावितरणच्या एका अधीक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता तसेच एजन्सीची नावे जाणून घेण्यासाठी अधीक्षक तथा प्रभारी मुख्य अभियंता प्रकाश जमधाडे यांना प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांची बाजू समजू शकली नाही.

बैठकीत संचालकांचे असे आहेत आदेश

● उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यासाठी महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रिडींग अचूकच झाले पाहिजे.

● मीटरच्या रिडींगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व बिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही.

● मीटर रिडींगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा

एजन्सीज आणि अधिकाऱ्यांना सूचवले उपाय

या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रिडींगमधील चुका, सदोष रिडींग, मीटर नादुरुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.

अधिकारी आणि एजन्सीवर कारवाई होणारच

मीटर रिडींग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रिडींग घेतल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रिडींगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

असे दिले निर्देश

अचूक मीटर रिडींगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. दैनंदिन पर्यवेक्षण करावे. बिलिंग किंवा रिडींगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्याव्यात असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.