Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

धक्कादायक! रिंगरोडच्या डांबरीकरणात भ्रष्टाचाराची 'रिंग'? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तिसगाव ते मिटमिटा या रिंगरोडचे (Ring Road) डांबरीकरण झाले खरे. परंतु, या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार झाल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे भूसंपादन करूनही हा रस्ता रखडला होता. यावर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून घाईघाईत काम करून घेतले. कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याने या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तिसगाव ते मिटमिटा या रिंगरोडसाठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने १४ कोटी ७२ लाख ४६ हजार ५०१ रुपये मंजूर केले होते. त्यातून या रस्त्यांच्या कामाला ११ जुलै २०१७ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील किशोर चोरडिया यांच्या चंदन इंजिनिअर्स ॲन्ड काॅन्ट्रेक्टर प्रा. लि. या कंपनीला कंत्राट देण्यात आला होता.

तब्बल १४ कोटी ७२ लाख ४६ हजार ५०१ रुपये किमतीत ४७७० मीटर लांबीचा तिसगाव ते मिटमिटा पर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी कंत्राटदाराला २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्याचा देखभाल दुरुस्तीसाठी ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, कधी रस्त्याच्या मधोमध महावितरणचे पोल तर कधी अतिक्रमण असल्याचे कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बॅंक प्रकल्प शाखेतील अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीने रिंगरोड दुरुस्तीकडे कानाडोळा केला.‌

मुदती नंतरही  रखडलेल्या या रिंगरोडच्या कामाबाबत 'टेंडरनामा'ने प्रहार केल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याचे काम मार्गी लावले. मात्र रस्त्याचा दर्जा खालावलेला आहे. 

संबंधित कंत्राटदाराने रेल्वे भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला खडीकरण केले पण डांबरीकरण केलेच नाही. पुढे अनेक ठिकाणी पॅचेस तसेच सोडून देण्यात आल्याचे "टेंडरनामा"च्या पाहणीत उघड झाले आहे‌. ज्या ठिकाणी काम केले आहे, तिथे केवळ जाड खडी मिश्रित डांबराचा थर टाकण्यात आला आहे. परिणामी, रस्त्याचे काम निकृष्ट केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तसेच रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींनी देखील या भ्रष्ट कामावर चुप्पी साधलेली असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

डांबरी रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करून त्यामध्ये आवश्यक त्या जाडीची खडी टाकून त्यावर थोडा मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते. नंतर त्यावर आवश्यक त्या जाडीच्या खडीचा डांबर मिश्रित थर टाकण्यात येतो. त्यानंतर या थराला घट्ट पकडून ठेवण्यासाठी बारीक खडीचा चुरा मिश्रित डांबरीकरणाचा एक थर द्यावा लागतो. त्याने रस्ताही गुळगुळीत होतो. परंतु कंत्राटदाराने चक्क या थरला फाटा दिल्याचे "टेंडरनामा"च्या तपासात समोर आले आहे.‌

यावरून कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आल्याचे दिसून येत नाही. डांबरी करणाच्या कामाला बगल देण्यात आली असून, या रस्ते कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय बळावत आहे. त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.