Ambadas Danve Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्ग सहापदरी करा;अंबादास दानवेंची मागणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : छत्रपती संभाजीनगर ते नगर, पुणे महामार्गावरील वाहतूककोंडी पाहता हा रस्ता सहापदरी करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर ते नगर, पुणे या ७५३ एफ नावाच्या महामार्गाला केंद्र सरकारने राज्य सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रीयमहामार्गाचा दर्जा दिला आहे. मात्र, हा रस्ता केंद्र सरकारने अद्याप ताब्यात न घेतल्याने रस्त्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा रस्ताअपुरा पडत असून वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरांचा विस्तार पाहता या रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सध्याची ३० मीटर जागा संपादित करूनसहा पदरी काँक्रीट रस्ता बांधावा. जेणेकरून मराठवाड्यातील गंगापूर, नेवासे, पारनेर, शिरूर तालुक्यांतील शेतकरी, व्यापारी, धार्मिक, पर्यटन व औद्योगिक वसाहतींना फायदा होईल असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे. ७५३ एफ महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी दानवे यांनी केंद्रीय परिवहनमंत्री यांच्याकडे केली आहे.