Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शिवाजीनगर भुयारी मार्गात ड्रेनेज अन् जलवाहिनीने केली 'कोंडी'

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले; मात्र या भुयारी मार्गाच्या कामात महानगरपालिके नव्यानेच टाकलेली मलनिःसारण  वाहिनी पुन्हा फुटल्याने रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बॅंक प्रकल्पाने नियुक्त केलेले दोन्ही कंत्राटदार हतबल झालेले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी‌ गत २५ दिवसांपासून जलवाहिनी टाकण्यासाठी टाळाटाळ करत आहे.‌ दरम्यान दोन्ही बाजूंना जोड रस्ते आणि भुयारी मार्गाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.‌यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे रेल्वे आणि बांधकाम विभागाने पत्रव्यवहार करूनही अधिकाऱ्यांनी हात वर केल्याचे एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले आहे.

शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक-५५ येथे वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्गाची नितांत आवश्यकता आहे. मात्र भुयारी मार्गाच्या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महानगरपालिकेचे मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. भुयारी मार्ग विकास आराखड्याअंतर्गत अडथळा येत असलेली भूमिगत सांडपाणी वाहिनीचे काम महापालिकेने स्थलांतरित केली.‌मात्र निकृष्ट पद्धतीने काम झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कंत्राटदाराने वाहिनीवर टाकलेले चेंबर बांधकाम करतानाच मातीचे आच्छादन बंद करीत आहे. परिणामी, चेंबरचे काम कच्चे राहिले आहे.‌ मात्र, अशा दर्जाहीन कामांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित ठेकेदारांवर अंकुश राहिला नसल्याची तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गात अडथळा निर्माण करणारी सांडपाण्याची भुमिगत वाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुमारे पंधरा १७ लाख रुपयांचा निधी खर्च करून शिवाजीनगर वाणी मंगल कार्यालयाच्या एका बाजूने सांडपाणी वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी मार्गी लावले.वास्तविक, भविष्याचा विचार करता  चेंबरचे बांधकामात प्लास्टर थातुरमातुर केले.‌ पाइपांचे जाॅईंट करताना त्यात सिमेंट भरले नाही.‌ परिणामी गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात सांडपाणी वाहिनी फुटुन भुयारी मार्गात पाणीच पाणी साचले. कामगारांना  दूषित पाण्याचा सामना करावा लागत  आहे.

रस्त्यासाठी बांधणी केलेला १० मीटरचा स्टील रॅंम्प देखील सांडपाण्याखाली आला आहे. संध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कंत्राटदार जीएनआय कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रेल्वेगेट ते शिवाजीनगर वाणी मंगल कार्यालय दरम्यान ९५ मीटर पैकी ७० मीटर रस्त्याचे काम झाले आहे. मात्र महानगरपालिकेने सांडपाणी वाहिण्यांवरील चेंबर बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात आहे. त्यात बांधकामानंतर पाणीही मारले नाही. उलट त्यावर जेसीबी मशिनच्या साह्याने माती टाकून चेंबर बुजवले आहेत. त्यामुळे चेंबरचे काम पक्के झाले नाही, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. बांधकाम विभागाने पत्रव्यवहार करूनही कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.‌दुसरीकडे रेल्वेने ट्रॅकखालचा पोर्शन पुर्ण करून ३१ मार्च पूर्वी बांधकाम विभागाकडे भुयारी मार्ग हस्तांतरीत केला जाईल, असे लेखी सांगितले होते.‌ मात्र ट्रॅकखाली देखील सांडपाणी वाहिनीचा अडथळा आल्याने महानगरपालिकेने हात वर केल्यावर रेल्वेला सांडपाणी वाहिनीचे काम करण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लोटला. हे काम झाल्यानंतर रेल्वेने गतीशक्तीने भुयारी मार्गाचे काम केले. मात्र हे काम सुरू असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हायप्रेशर जलवाहिनी टाकण्याची आठवन आली. मात्र २५ दिवसाचा कालावधी लोटल्यानंतर देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलवाहिनी टाकण्यासाठी टाळाटाळ करत आहे. दरम्यान रेल्वे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हतबलता आली आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. या भुयारी मार्गाच्या कामाला वर्षभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सातारा-देवळाई, सिंदोन-भिंदोन, बाळापूरसह लगतच्या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे; परंतु महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गाची पार कोंडी झाल्याची वस्तुस्थिती टेंडरनामाच्या स्पाॅट पंचनाम्यातून समोर आली आहे.