Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शिवाजीनगर रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग; सातारा, देवळाईकरांचा प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाई अन् बीडबायपासकरांसह आसपासच्या शेकडो पंचक्रोशीतील ग्रामस्थांच हा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याभागातील नागरिकांची ये-जा सोयीचे व्हावी यासाठी सदर रेल्वेगेटवर भुयारी मार्ग काढण्याचा निर्णय राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

तब्बल ३८ कोटी रूपये खर्च करून शिवाजीनगर रेल्वे रुळाखालून हा भुयारी मार्ग उभारला जात आहे.त्यामुळे सातारा-देवळाई व बीडबायपासकरांसह आसपासच्या शेकडो पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र्य मार्ग उपलब्ध होणार असल्याने याठिकाणी होणारी कोंडी आता टळणार आहे. मे महिन्याअखेर रेल्वेच्या हद्दीतील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. शिवाय हा प्रवास आणखी वेगाने करण्याच्या दृष्टीने कंत्राटदार जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चरकडून देखील शिवाजीनगर रेल्वे फाटकापासून वाणी मंगल कार्यालयालगत ॲप्रोच रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने जी.एन.आय कंन्सट्रक्शन कंपनीच्या अभियंत्यांना विचारले असता वाणी मंगल कार्यालय ते शिवाजीनगर रेल्वेफाटक ते बीडबायपास देवळाई चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी ३३२ मीटरपर्यंत सहा मीटर खोलीचे खोदकाम केले जाणार आहे. जिथे दोन्ही बाजूंना चढ - उतार आहे, तेथे खोली कमी असेल. भुयारी मार्गातील ॲप्रोच रस्त्यांची रूंदी ही १४.५ मीटर असेल. भुयारी मार्गाच्यावर व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने दोन्ही बाजूंना फुटपाथची सोय आणि भुयारी मार्गाच्या दिशेने आरसीसी सुरक्षाकठडे उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.भुयारी मार्गातील या कामासाठी २८ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता शिवाजीनगर रेल्वे फाटकापासून ते शिवाजीनगर नाल्यांपर्यंत मलनिःसारण वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळाखाली आरसीसी बेड काॅक्रीटचे काम झाले आहे. त्यावर गर्डर उभारणीचे काम सुरू करत आहोत. त्यानंतर बाॅक्स फिटींग करण्यात येईल. मे अखेरपर्यंत भुयारी मार्गाचे काम आटोक्यात येईल. रेल्वे रुळाच्या हद्दीत रेल्वे प्रशासन १० कोटी खर्च करत आहे. भुयारी मार्गाचे काम नूरसिंहा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत व पोहोच मार्गाचे काम जी.एन.आय.इन्फ्रास्टक्चर कंपनीकडून युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मे अखेर भुयारी मार्गाचे बांधकाम संपुष्टात येईल. हा भुयारी मार्ग सातारा-देवळाई व बीड बायपासकरांसह आसपासच्या शेकडो पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांच्या वाहतुकीसाठी महत्वाचा ठरणार आहे. गत चार दशकांपासून शिवाजीनगर रेल्वे फाटकावर दररोज मोठी कोंडी होत असे. आता भुयारी मार्गामुळे या रेल्वेफाटक  वाहनांचा भार नाहीसा होणार आहे.

टेंडरनामा प्रतिनिधीने रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह होत असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली. येथे भुयारी मार्ग व्हावा यासाठी सातारा-देवळाई नागरी कृती समितीचे अध्यक्ष बद्रिनाथ थोरात , ॲड. शिवराज कडू पाटील, जनसेवा महिला समितीच्या अध्यक्षा ॲड. वैशाली कडू पाटील, संघर्ष समितीचे सोमीनाथराव शिराणे, पद्मसिंह राजपुत, असद पटेल, आबासाहेब देशमुख, मेघा थोरात, सविता कुलकर्णी, कांता कदम तसेच शहरातील खंड्डेमय रस्त्यांसाठी याचिका दाखल करणारे व शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे भुयारी मार्गाचा रखडलेला मुद्दा उपस्थित करणारे ॲड. रूपेश जैस्वाल यांनी देखील शिवाजीनगर रेल्वे फाटकावर स्वतंत्र्य भुयारी मार्ग असावा, असा आग्रह धरला होता. यामुळे येथील रेल्वे फाटकावर प्रवासही खंडीत होणार नाही आणि या भुयारी मार्गामुळे आता वाहतूक कोंडी होणार नाही. यासंदर्भात राज्य सरकारसह न्यायालयाच्या देखील सूचना पुढे आल्या होत्या. हे लक्षात घेऊनच शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे हा भुयारी मार्ग काढला जात आहे.