Sambhajianagar Tendernama
मराठवाडा

Shendra MIDC : शेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाची शेंद्रा औद्योगिक वसाहत, पण जयपूर रस्त्याचे भाग्य उजळेना?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरतालुक्यातील पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगत प्रमुख जिल्हा मार्ग - २० जयपूर गावातील रस्त्यावर डांबरच शिल्लक नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना रस्त्यातील खड्डे आणि चिखलातून मार्ग काढत हाल सोसावे लागतात. याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीसाठी साकडे घातले आहे.

जयपूर हे गाव लहुकी मध्यम प्रकल्प आणि पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत असल्याने औद्योगिक वसाहतीमुळे गावालगत शेतजमीनींना सोन्याचे भाव आले आहेत. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट संपुष्टात आल्यामुळे बाजुलाच विस्तारित शेंद्रा औद्योगिक वसाहत ही जयपूर औद्योगिक वसाहत या नावाने उदयास येत आहे. या वसाहतीकरीता आवश्यक जयपूर येथील १९२ हेक्टर जमीन भूसंपादन करण्यात आली आहे. जयपूर येथील औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एका कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्याची दोन वर्षांपूर्वीच देण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगरातील वाळूज, शेंद्रा तसेच ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतींमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. तेथे भूखंडाचे दरही जास्त आहेत. याशिवाय वाळूज तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये आता भूखंड शिल्लक नाहीत दुसरीकडे स्टार्टअप, लघु - मध्यम उद्योगांना जास्तीच्या दरात भूखंड घेणे परवडत नाही. त्यासाठी नवीन जयपूर औद्योगिक वसाहत विकसित केली जात असून येथील पायाभूत सुविधांचे काम देखील पूर्ण झाल्यानंतर करण्यात आले आहे. तेथे उद्योगांना प्रत्यक्षात प्लॉट वाटप देखील करण्यात आले आहेत. 

एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहत असा डंका पिटवला जात असताना याच वसाहतीलगत करमाड फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील जयपूर गावाकडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे.‌ पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत जयपूर रस्त्यावर साखळी क्र.१/५०० दरम्यान लहुकी नदीवर २६ मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता. यासाठी ७३ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. पुलाचे काम १ मार्च २०१३ रोजी सुरू करून २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर येथील चंद्राम आशन्ना कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले होते. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत १८०० मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी ५२ लाख १२ हजार रूपये खर्च करण्यात आले होते. ३ जुलै २००९ रोजी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. २२ ऑक्टोबर २०१० रोजी कंत्राटदार मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम पूर्ण केले होते. मात्र तब्बल १४ वर्षानंतर ग्रामसडक योजनेंतर्गत पुन्हा रस्त्याचे काम केले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जयपूर या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे. गावात पुढील शिक्षण आणि दवाखान्याची सोय नसल्याने त्यामुळे ग्रामस्थ महिलांना शेजारील करमाड अथवा छत्रपती संभाजीनगरात जाणे - येणे करावे लागते. गावास जोडणारा रस्ता वारंवार मागणी करूनही दुरूस्त केला जात नाही. सद्यस्थितीत रस्त्याची पार चाळणी झाली आहे. पावसाळ्यातर पक्क्या रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल होतात. 

या गावाकडे जाणाऱ्या खड्डेमय रस्त्याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. गावकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत जावे लागते. त्यातच आजारी रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यास कोणतेही वाहन रस्त्यांवर चालू शकत नाही. यामुळे आमचे जिणे असाह्य झाल्याचे ग्रामंस्थांचे म्हणणे आहे. 

यासाठी तत्काळ रस्ता करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान तालुक्यात सर्वत्र विकास कामांचा झंझावात चालू असताना जयपूर गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत असून गावाकडे कुणीही अधिकारी तसेच राजकीय मंडळी फिरकत नाही. यामुळे आमदार तसेच जि. प. सदस्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.