Aurangabad

 

Tendernama

मराठवाडा

शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी सुधारीत भूसंपादन प्रस्ताव पाठवा...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शिवाजीनगर (Shivajinagar) रेल्वेगेट येथे उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासाठी (Subway) मौजे सातारा हद्दीतील ग. नं. १२४/२ व १३१ मधील २४ मीटर रूंद रस्त्यासाठी संपादन क्षेत्राची खात्री करा व तसा सुधारीत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाठवा, असे पत्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाचे विशेष भूसंपादन अधिकारी वि. भा. दहे यांनी पीडब्ल्यूडी अंतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखा व महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांना पाठवल्याने शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा कागदी घोडे नाचवण्याचा प्रयोग सुरू झाल्याने तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

पुन्हा कागदी घोडे...

यापूर्वी पीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच महापालिकेने शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाई चौका दरम्यान मोजणी केली असता सुमारे १७२८ चौरस मीटर जागेची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पीडब्ल्यूडीने महापालिकेमार्फत भूसंपादनासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना पुढील प्रक्रियेसाठी एक कोटी ८१ लाख ३४ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर महापालिकेने पुढील भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. एकीकडे येथील बाधीत जागेचे भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असताना विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मध्येच नवीन फतवा काढल्याने शिवाजीनगर रेल्वेगेट भूयारी मार्गाबाबत किती वर्षे सरकारी यंत्रणा कागदी घोडे नाचवणार आहे, असा सवाल औरंगाबादकर करत आहेत.

विशेष भूसंपादन अधिकाऱ्याशी 'खास'बात

या संदर्भात टेंडरनामाने विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांना विचारणा केली. ते म्हणाले की, गेल्या सोमवारी (ता. १४ मार्च) मी पीडब्ल्यूडी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यामार्फत दुपारच्या सत्रात जवळपास दीड तास पाहणी केली होती. यात पीडब्ल्यूडी अंतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखेचे उप अभियंता शरद सूर्यवंशी आणि महापालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना विभागातील उप अभियंता संजय चामले यांच्यासह यापूर्वी उप अधीक्षक, भुमीअभिलेख कार्यालय यांनी दिलेल्या मोजणी नकाशाप्रमाणे रस्त्याची चतुसिमा, लांबी व रुंदी तपासली.

त्या वेळी पीडब्ल्यूडीचे उप अभियंता सूर्यवंशी यांनी मोजणी नकाशाची पाहणी केली असता त्यात बीड बायपासपर्यंतचे क्षेत्र मोजणी नकाशात दिसून येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे २४ मीटर रूंद रस्त्यासाठी याही क्षेत्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या हद्दीतील भूसंपादन मंडळ महापालिका आणि जागतिक बॅंक प्रकल्प शाखेतील अधिकाऱ्यांनी रस्त्याची आवश्यक लांबी, रुंदी आणि सलगता विचारात घेऊन नव्याने मोजणी नकाशावर आवश्यक ते वाढीव क्षेत्र दर्शवून एकत्रित क्षेत्राचा अचूक सुधारित प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा असे पत्र १४ मार्च रोजी दिल्याचे त्यांनी सांगितले. तथापि आठ दिवसानंतर देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असे ते म्हणाले.

महापालिकेने याची खात्री करावी...

तत्पूर्वी महापालिकेने सदर भूसंपादन करावयाच्या जागा मालकांना कुठलाही मावेजा, वाढीव बांधकाम परवानगी यापूर्वी दिली नसल्याची खात्री करूनच प्रस्ताव सादर करावा, असाही पत्रात नमूद करण्यात आले आहे.