Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे बघा छत्रपती संभाजीनगरात काय घडले?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : कंत्राटदाराच्या (Contractor) हलगर्जीपणामुळे रविवारी (ता. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास तीन बुलेटस्वार तरूण पुलाच्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले. गेल्या तीन महिन्यांपासून पुलाचे काम रखडले होते. चार दिवसांपूर्वी कंत्राटदाराने नवल अपार्टमेंट ते चिरंजीवी बाल रुग्णालयालगत आठ ते दहा फूट रुंद व दहा ते बारा फुटांचा खोल खड्डा तसाच ठेऊन पुलाचे काम बंद ठेवले होते.

दरम्यान कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यांच्या दोन्ही बाजूंना वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना सावधानतेचा इशारा देणारे फलक न लावल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप या भागातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना केला आहे. रात्री अपघात झाल्यानंतर कंत्राटदाराने सकाळी साडेदहाच्या सुमारास बॅरिकेड्स लाऊन तत्परता दाखवली, असे या भागातील रहिवासी नितीन देशमुख यांनी सांगितले.

उल्कानगरी रामायणा हाॅल ते विभागीय क्रीडा संकुल या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले. कंत्राटदाराने मानकाप्रमाने काम न केल्याने आधीच या भागातील नागरिकांना पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याचा त्रास सोसावा लागला. खोदकाम न करताच आहे त्याच चाळणी झालेल्या डांबरी रस्त्यावर जेसीबीच्या पात्रांनी रस्ता ओरबाडून कंत्राटदाराने रेडीमिक्स काॅंक्रिटचे थरावर थर चढवत रस्त्याची उंची वाढवल्याने उल्लेखीत मार्गावरील दुकाने व घरे खड्ड्यात गेली. रस्त्याचे काम झाल्यावर कंत्राटदाराने दोन्ही बाजूंना पॅव्हरब्लाॅक टाकून पुन्हा नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले.

परिणामी पावसाळ्यात नागरिकांना तुंबलेल्या पाण्यामुळे त्रास असह्य झाल्यावर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व  स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या. त्यांनी रस्त्याची पाहणी केली. दरम्यान दिलेल्या सूचनांची कंत्राटदाराकडून पुर्तता झाली नाही. याउलट काही महिन्यांपूर्वीच तयार झालेल्या या रस्त्याची आज बिकट अवस्था झाल्याची व्यथा नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

याच रस्तेकामाच्या अंदाजपत्रकात उल्कानगरी येथील रायायणा कल्चरल हाॅललगत नवल अपार्टमेंट ते चिरंजीवी बालरुग्णालय तसेच ज्ञानेश्वरनगर येथील दोन नळकांडी पुलांच्या जागी काॅंक्रिट पुलांच्या कामाचा समावेश करण्यात आला होता. कंत्राटदाराने आधीच रस्त्याच्या कामात मोठा हलगर्जीपणा केला. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर कसेबसे त्याने काम करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र पुलांचे काम सलग चार महिने रखडल्याने नागरिकांनी तक्रारीचा प्रपंच चालूच ठेवला होता.

अखेर त्याने रखडलेल्या दोन पुलापैकी उल्कानगरीतील रामायणा कल्चरल हाॅललगत जुन्या जीर्णपुलाचे काम चार दिवसांपूर्वी सुरू केले. बांधकामासाठी मोठा खड्डा खोदला. परंतु या कामातही त्याने कमालीचा हलगर्जीपणा केला. 

खड्डा खोदून काम पुन्हा बंद पडल्यामुळे पुलाची रखडपट्टी झाली. या पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या दोन्ही बाजूंना वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले नाहीत. नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून तेथे दोन्ही बाजूंना सुरक्षारक्षक तैनात केले नाहीत. परिणामी नळकांडी पुलाचा वापर बंद न करता धोकादायक भाग तोडून खड्डा त्याच अवस्थेमध्ये ठेवून कंत्राटदाराने यंत्रणा पसार केली. काम सुरू न केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर वाढली आहे. शिवाय येथे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे तीन बुलेटस्वार मुले वाहनासह कोसळली. रात्री येथे पथदिवे बंद होती.

कंत्राटदाराने कुठलेही सावधानतेचा इशारा देणारे फलक न लावल्यानेच अंधारात खड्डा न दिसल्याने ती कोसळल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. मात्र या अपघाताची कुनकून लागताच कंत्राटदाराने खड्याच्या दोन्ही बाजूंना वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले. मात्र याआधीच कंत्राटदाराला अशी अक्कल का सूचली नाही, असा सवाल करत नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. यापुढे देखील अशा जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण झाल्याचा दावा प्रवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुलांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.