Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : संत तुकाराम नाट्यगृहाचे काम संथगतीने; कधी वाजणार घंटा?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जुन्या शहरातील उस्मानपुरा व निरालाबाजारप्रमाणे सिडकोतही सर्व सुविधांनी युक्त नाट्यगृह व्हावे, या हेतूने १५ वर्षांपूर्वी शहराचे शिल्पकार सिडकोने पुढाकार घेऊन नवीन छत्रपतीनगर अर्थात सिडकोच्या मध्यवर्ती भागात गुलमोहर काॅलनीत भव्य असे नाट्यगृह उभारले. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत झालेले काम आणि कामाचा वेग पाहता, हे काम ठरलेल्या वेळेत होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने स्मार्ट प्रशासनाकडे विचारणा केली असता काम ठरलेल्या वेळेत पुर्ण होईल, असा दावा त्यांनी केला आहे. काम जोमाने सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात प्रतिनिधीने रंगमंदिराची सलग चार दिवस पाहणी केली असता तेथील दुरूस्तीचे काम गेल्या दीड महिन्यांपासून बंद असल्याचे त्यांनी सांगितले यावरून या कामात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका निर्माण होते.

सुरूवातीपासूनच हे अत्याधुनिक नाट्यगृह सिडकोनेच चालवावे असा निर्णय घेतला होता. मात्र सिडको-हडकोतील सार्वजनिक सुविधांचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर नियमाप्रमाणे नाट्यगृह महापालिकेत हस्तांतरीत करण्यात आले. मात्र महापालिकेची झोपाळू प्रशासकीय यंत्रना व फुटकळ दुरूस्तीकडे दिरंगाई आणि बेजबाबदारपणामुळे नाट्यगृहाचे काही वर्षातच तीन तेरा वाजले. २०१९ पासून निधी अभावी दुरूस्तीचे काम रखडले होते. तेव्हापासून नाट्यगृहाला टाळे लागले होते.

अनेक वर्षे निधी अभावी काम रेंगाळल्यानंतर, एक वर्षापूर्वी स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या माध्यमातून या नाट्यगृहाच्या पडझडीला नव्याने उभारणीला पुन्हा सुरुवात झाली. मात्र आताही हे काम संथगतीनेच सुरू असल्याने हे काम ठरलेल्या वेळेत होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरुवातीला या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी २९ कोटी रुपयांचा खर्च आला होता. तद्नंतर दुरूस्तीसाठी केवळ तीन कोटीचा खर्च अपेक्षित होता. मात्र दिरंगाईमुळे आता हा खर्च १० कोटींवर गेला आहे. मराठवाडयाला ऐतिहासिक व पर्यटकांची राजधानीसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणार्या कलावंतांची खाण म्हणून पाहिले जाते. याच ऐतिहासिक राजधानीतीचे विभागीय शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरकडे मोठे सांस्कृतिक केंद्र म्हणून बघितले जाते. शहरात आधी संत एकनाथ रंगमंदिर हे  एकमेव  नाट्यगृह होते.परिणामी नवीन छत्रपती संभाजीनगरातील नाट्यरसिकांनी रात्री अपरात्री नाट्यप्रयोगांचा आनंद लुटणे म्हणजे भरघोस रिक्षाभाडे आणि लुटमारीच्या भितीने जाणे जिकीरीचे होते. शिवाय एकाच रिक्षात कुटुंबासह प्रयोगाला जाणे अवघड असल्याने दुहेरी प्रवासभाडे मोजावे लागत असे.  त्यामुळे सिडकोत नाट्यगृह उभारण्याचा निर्णय १५ वर्षांपूर्वी घेण्यात आला. सिडकोतील  रसिकांबरोबरच हडको, हर्सुल, नारेगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा व आसपासच्या पंचक्रोशीतील व  परिसरातील नागरिकांनाही यामुळे चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. तत्कालीन सिडकोने एन-५ गुलमोहर काॅलनीत नाट्यगृहाच्या जागेसाठी भव्य मोठा भुखंड आरक्षित ठेवला होता. दरम्यानच्या काळात  सिडकोने सदर भुखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी काही राजकीय लोकांच्या दबाबाने बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव शहरातील रंगप्रेमींनी उधळला. तद्नंतर सिडकोचे महापालिकेत हस्तांतरण झाले होते. मात्र  सिडकोकडून आरक्षित भूखंडावर सिडकोनेच नाट्यगृह उभारावे, अशी मागणी पुढे आल्यावर सिडकोने नाट्यगृह उभारले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात १७ सप्टेंबर २००६ रोजी या नाट्यगृहाचा पायाभरणी समारंभ झाला झाला होता. २१ नोव्हेंबर २००८ रोजी देशमुखांच्याच हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला होता. मुळात २७ जुलै १९९६ रोजी माजी पालकमंत्री तथा राज्याचे गृहनिर्माणमंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नाट्यगृह उभारणीचा भूमिपुजन सोहळा पार पडला होता. त्याच काळात या नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि निधीचा तुटवडा यामुळे नाट्यगृहाचे काम रखडले. तब्बल त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर  २००६ मध्ये या नाट्यगृहाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली व २००८ मध्ये उद्घाटन सोहळा पार पडला दरम्यान ही नाट्यरसिकांची खुप वर्षांची मागणी पुर्ण करताना विलासरा देशमुख यांनी सदर नाट्यगृह महापालिकेच्या ताब्यात देऊ नका, अन्यथा येथील विकासकामांना आणि खुर्च्यांना घुसा पोखरून खातील. झालेही तसेच महापालिकेककडे नाट्यगृहाचे हस्तांतरण होताच नाट्यगृहाची वाट लागली. २०१९ मध्ये कायमचा ताला लागला.

त्यानंतर मार्च २०२२ मध्ये तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन  या नाट्यगृहाच्या दुरूस्तीला सुरुवात केली. यासाठी केंद्रीय स्मार्ट सिटी बोर्डाकडून १० कोटी रूपये मंजुर करून घेतले. यात आरसीसी वर्क, स्थापत्य विषयक विविध कामे, वातानुकुलीत यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, उद्वाहक, अंतर्गत सजावट, रंगमंच दुरूस्ती, आसन व्यवस्था, समोरील सुशोभिकरण तसेच स्टील फेब्रीकेशन आदी सर्वच कामांची दुरूस्ती करून नाट्यगृह जैसे थे करण्याचा प्रयत्न सुरू केला. यात पुण्याच्या कन्सेप्ट क्रियेटर या कंपनीला १६ टक्के दराने सिव्हील व इंटेरियलचे काम देण्यात आले आहे. तर पुण्याच्याच जे.डी. इंटरप्रायझेसला लाईट व साऊंडचे काम देण्यात आले आहे. खुर्च्यांचे दरपत्कानुसार मुंबईच्या  पेन वर्कर यांना ठेका देण्यात आला अकरा हजार किंमती प्रमाणे अकराशे खुर्च्या येथे बसवल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील हरेश सिद्दीकी यांच्या डिझाईन ब्युरो या कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. नव्वद टक्के काम झाल्याचा स्मार्ट सिटी प्रशासनाने दावा केला असला तरी प्रत्यक्षात प्रतिनिधीने सलग पाच दिवस कामाची पाहणी केली असता तेथे कुठल्याही ठेकेदार कंपनीचे कर्मचारी हजर नव्हते. येथील सुरक्षा रक्षकांना विचारणा केली असता अधूनमधून दोन चार लेबल येतात. थोडेबहुत काम करून निघुन जातात. गत दिड महिन्यापासून काम बंद झाल्यात जमा असल्याचे त्यांनी सांगितले. एकूनच स्मार्ट सिटी प्रशासनाकडून देखील निधीअभावी  हे नाट्यगृह वादात अडकते की काय, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे  तीस टक्केही काम झाले नसल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत दिसून आले.