Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अवघ्या साडेतीन तासांच्या बैठकीसाठी दररोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र असतानाही G-20 परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते, उड्डाणपूल, सौंदर्यबेट व वाहतूक बेटातील कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी केली होती. आता मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपींना शहर स्वच्छ व सुंदर आणि आकर्षक दिसावे म्हणून लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे.

शहरातील जालनारोड, व्हीआयपीरोड, जळगावरोड आणि प्रत्येक चौक आणि उड्डाणपूल उजळून निघावेत यासाठी गत दोन दिवसांपासून महापालिका कारभाऱ्यांमार्फत थेट पिण्याच्या पाण्याचा मारा करत स्वच्छता  केली जात आहे. हा प्रकार पाहून छत्रपती संभाजीनगरकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

राज्यात पावसाच्या हंगामातील १२० दिवसांपैकी केवळ १८ दिवस उरले असून आतापर्यंत पावसाची ११ टक्के तूट असून नाशिक जिल्ह्यात ती ४ टक्के आहे. सर्वाधिक तूट मराठवाड्यात असून धाराशिवमध्ये ९० तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ८२ टक्के असल्याने पूर्ण मराठवाड्यासह राज्यातही दुष्काळाच्या झळा तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

पावसाचे अंत्यल्प प्रमाण असल्याने तसेच हंगामही संपत आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने राज्यासह मराठवाड्यातील शेतकरी चिंतीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात आठवड्यात एकदा अर्धातास देखील पाणी पुरवठा होत नाही. जायकवाडी धरणातील जलसाठा देखील आटत चालला आहे. अशा भयानक परिस्थितीत कारभाऱ्यांकडून रंगरंगोटीला उजाळा देण्यासाठी थेट चार हजार ते दहा हजार लिटर पाण्याचे टॅंकर जलकुंभांवरून भरून भरमसाट पाण्याचा वापर करत धुलाई सुरू आहे. हे चित्र पाहून छत्रपती संभाजीनगरकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.