Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर गत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊसाने दमदार सुरूवात केली आहे. शहरातील बीड बायपास रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील अनेक ठिकाणी पाणी साचले असून, या रस्त्याची उंची वाढल्याने अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणचं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. गत महिन्याभरापासून शहरात मोठा पाऊस नव्हता. मात्र काही दिवस गेल्यानंतर दोन दिवसात जोरदार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे शहरात अनेक भागातील रस्त्यांवर पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून महामार्गावर आणि बीड बायपाससह इतर राज्य मार्गांवर पाणी साचल आहे.
यात नव्यानेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने एमआयटी चौक, संग्रामनगर उड्डाणपुल, देवळाई चौक तसेच झाल्टा फाटा व पैठण जंक्शन येथे पावसाचे पाणी साचत असल्याने य महामार्ग ठप्प होत आहे. त्यामुळे महामार्गावर लांबच - लांब रांगा लागत आहेत. महामार्ग बनवल्यापासून महामार्गालगत अनेक ठिकाणी पावसाच उतारावरील वसाहतीत शिरत असल्यामुळे अनेक वाहन चालकांसह वसाहतीत राहणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत का? तसेच हायवेला लागून असलेल्या वसाहती आणि व्यापारी प्रतिष्ठाणांमध्ये पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे अनेक घरे, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीत नागरिकांची असुरक्षितता वाढली असून, अनेक वसाहती पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. या रस्त्यावर वाहतुकही सुरू करण्यात आली आहे. मात्र चुकीचे उड्डाणपूल आणि चुकीच्या बांधकामामुळे अधिकारी व कंत्राटदार मिळून अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. अंदाजपत्रकात अनेक तांत्रिक बाबींची चूक केल्याने व रस्त्याच्या कामात घोळ असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करूनही सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी अधिकारी व कंत्राटदाराने केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागत आहे.
शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण रस्त्याच्या मजबुती-करणासाठी मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. या रस्त्याच्या बांधकामासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले पण त्यासाठी निधीची उपलब्धतता होत नव्हती. हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. इस्टिमेट तयार केले गेले. त्यातअंतर्गत २९२ कोटीतून होणाऱ्या या रस्त्यावर तीन उड्डाणपूल बनविण्यात आले आहेत. करोना पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली असताना आहे. मात्र देशभरात त्या काळात छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासच्या कामाला त्याचा अडथळा येऊ दिला नव्हता.
टेंडर प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले. एप्रिल २०२० पासून या बीड बायपासचे काम सुरू आहे. पण करोना लॉकडाऊनमुळे अडथळा आल्याने काम बंद केले होते. महानुभाव चौक आश्रम ते झाल्टा फाटा, झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक, झाल्टा फाटा ते आडगाव नाका, हाॅटेल अंबिका ते धुळे - सोलापूर हायवे उड्डाणपुलापर्यंत रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारले गेले.
महानुभाव चौक ते झाल्टा फाटा हा १३ किलोमीटरचा रस्ता बीड बायपास म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११चा एक टप्पा शहरातून (जालना रोड) जातो. या रस्त्यावरून जड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरून वळविण्यासाठी बीड बायपासची निर्मिती केली गेली. त्यामुळे नांदेड, जालना तसेच बीडकडून येणारी वाहने शहराबाहेरून पुणे, मुंबई, नाशिककडे जातात, त्या वाहनांमुळे रस्ता ओलांडून जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत होत्या.
रस्ता मजबुतीकरणानंतर हा त्रास कमी होईल, असे वाटले होते. मात्र काम सुरू असतानाच रस्त्यावर भेगा पडल्या. सरफेस उखडला. त्यात ३० मीटर रुंदीतच रस्त्याचे छोटे छोटे तुकडे करून रूंदीकरण केल्याने रस्ता अरूंद झाला आणि प्रवाशांच्या अडचणीत भर पाडली. बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना जोड रस्ता मोकळा करून रस्त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक असताना याला फाटा देण्यात आला. 'हायब्रीड ॲन्यूटी' प्रकल्पातून हा रस्ता अंत्यंत निकृष्ट दर्जाचा केला गेला आहे.
'हायब्रीड अन्यूटी' अंतर्गत या रस्त्याची एकूण जी किंमत आहे. त्यापैकी ६० टक्के रक्कम राज्य सरकार संबंधित कंत्राटदाराला कामाच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार देत आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम आठ वर्षांत २० टप्पे करून दिली जाणार आहे. मात्र कंत्राटदाराने या मार्गावरील उड्डाणपुलांची उंची कमी केल्याने व जोड रस्त्यांचे लचके तोडल्याने सातारा - देवळाईकर आगीतून फुपाट्यात पडले आहेत.
चूक बांधकाम विभागाची शिक्षा महानगरपालिकेला
बीड बायपास हा रस्ता महानगरपालिकेच्या तीन झोन अंतर्गत येतो. यात पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबताच नागरिक महानगरपालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क करतात. दरम्यान काल झालेल्या मुसळधार पावसात झोन क्रमांक - १० अंतर्गत महानुभव आश्रम चौकात पावसाचे तीन ते चार फूट पाणी रस्त्यावर साचले होते.
दरम्यान महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा पाहणी केली. त्यानंतर वार्ड अभियंता लक्ष्मीकांत कोतकर यांना तातडीने सूचना देत त्यांनी यांत्रिक विभागाशी संपर्क साधून जेसीबी बोलावून घेत रस्त्याच्या कडेला चर खोदून जेसीबी द्वारे पाणी काढून देण्यात आले.
या ठिकाणी कंत्राटदाराने साईड ड्रेनचे काम न केल्याने बीड बायपासच्या सखल भागात पाणी साचल्याचा अहवाल वार्ड अभियंता लक्ष्मीकांत कोतकर शहर अभियंता यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यामुळे शहर अभियंता यावर नेमकी काय कार्यवाही करतात, याकडे सातारा - देवळाईवासीयांचे लक्ष लागून आहे.