sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : रेणुकापुरममधील रहिवाशांवर मोर्चा काढण्याची वेळ का आली?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सातारा परिसरातील गट क्रमांक - १०४ येथील रेणुकापुरम सहकारी गृहनिर्माण सोसायटी फेज-१ / फेज-२ मधील नागरिक विविध नागरी समस्यांनी त्रस्त आहेत.

रेणुकापुरम सोसायटीसमोरील फॉरच्यून पार्क व  ओम पॅराडाइज सोसायटीतील मुख्य ड्रेनेजलाइन फुटल्याने रेणुकापुरम सोसायटीलगत खड्ड्यात ड्रेनेजच्या पाण्याचा मोठा तलाव साचला आहे. त्यात पुन्हा पावसाच्या पाण्याची भर पडली आहे. यासोबत फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील नागरिकांसह इतर परिसरातील नागरिक याच खड्डयाचा वापर कचरा कुंडी म्हणून करत असल्याने दुर्गंधीत भर पडली आहे. याशिवाय फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटीतील जाहिरातीचे होर्डींग्ज वादळाने रेणुका पुरम सोसायटीच्या अंतर्गत मुख्य रस्त्याकडे झुकल्याने जिवीत व वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात दोन्ही सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना सांगून देखील दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे देखील तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. दरम्यान रेणुकापुरम येथील रहिवाशांनी रविवारी (२८ जुलै) रोजी फॉरच्युन पार्क व ओम पॅराडाइज सोसायटी समोर मोर्चा काढला. त्यात सोसायटीच्या बिल्डरांनी मध्यस्थी करून आठ दिवसात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देत रेणुकापुरम येथील रहिवाशांना दिलासा दिला. यासोबतच मनपा अधिकाऱ्यांनी देखील समस्या सोडविण्यासाठी ग्वाही दिली. मात्र आठ दिवसांत समस्यांचा निपटारा न झाल्यास मनपा कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रेणुकापुरम येथील रहिवाशांनी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -२११ बीड बायपास ते रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक या मार्गावर रेणुका पूरम सोसायटी ही वसाहत मुख्य डांबरी रस्त्यापासून खाली उतारावर आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून थेट खाली सोसायटीच्या आवारात शिरते. यामुळे गुडघाभर साचलेल्या पाण्यातून येथील रहिवाशांना वाट काढत मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते. अशा परिस्थितीत फॉरचून पार्क आणि ओम साई पॅराडाईज सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी रोड ते सातारा - देवळाई रस्त्यालगत पाइपलाइन टाकताना ड्रेनेजलाइन फोडून टाकली. त्यात सहा वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या संपूर्ण रस्त्याचे पार वाटोळे करण्यात आले.

संबंधित कंत्राटदाराकडे दुरुस्तीची तरतूद असताना त्याने रस्ता दुरुस्तीकडे कानाडोळा केला आधीच अरूंद रस्ता आणि त्यात खड्डेमय अवस्था झाल्याने प्रवाशांना रस्ता शोधूनही सापडत नाही. अशा केविलवाण्या अवस्थेत या मार्गावर असणार्या व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील मोकळी जागा भाजी - फळविक्रेत्यांना रोजंदारीने भाडेतत्वावर दिल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे सावट पसरलेले आहे. त्यातच गौण खनिजाची जड वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत असल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सतत अपघाताची भिती वाटत आहे. 

विविध समस्यांच्या चक्रव्युहात अडकलेल्या रेणुकापुरम सोसायटीलगत रेणुकामाता मंदिर कमान ते म्हाडा कॉलनी रोड येथील संपुर्ण ड्रेनेजलाइन जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून जलवाहिनी टाकताना फुटलेली आहे. दरम्यान रेणुकापुरम सोसायटीलगत मुख्य रस्त्याच्या बाजुला एक खुला  भुखंड रेणुकापुरम वासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. या भुखंडावर मोठमोठी रानटी झुडपे व गवत आकाशाला गवसनी घालत आहे. येथील झाडाझुडपात दिवसरात्र नको ते गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच भुखंडावर एका बिल्डरने मुरुमासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात ड्रेनेजच्या पाण्याचा तलाव साचला आहे.

त्यातच कचरा ही फेकण्यात येतो. याबाबत रेणुकापुरम सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी फॉरच्युन पार्क व‌ ओम पॅराडाइज सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना प्रत्यक्ष जाऊन ड्रेनेजलाइनचे घाण पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे रेणुकापूरम सोसायटीमध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे सोसायटीतील लहान मुलांचे, वृध्द व्यक्तींचे, संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने ड्रेनेजलाइन दुरुस्तीची विनंती केली होती. मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रेणुकापुरम येथील सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी २२ जुन २०२४ रोजी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र सरकारी काम १२ महिने थांब म्हणत अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले. 

यानंतर संतापलेल्या रेणुकापुरम सोसायटीच्या रहिवाशांनी रविवारी (२८ जुलै) रोजी सुटीच्या दिवशी फॉरच्युन पार्क व‌ ओम पॅराडाइज सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना धारेवर धरत आमच्या सोसायटीलगत खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी का सोडता, त्याच तलावात कचरा का टाकता, ड्रेनेजलाइन कधी दुरूस्त करणार, तुमच्या सोसायटीचा झुकलेला जाहिरात फलक आमच्या सोसायटीतील एखाद्या रहिवाशाचा जीव गेल्यावर काढणार काय, असे अनेक प्रश्न विचारत संताप व्यक्त केला.

दरम्यान सोसायटीचे बिल्डर पंजाबराव तौर यांनी धाव घेत तिन्ही सोसायटीतील रहिवाशांचे वाद मिटवले. त्यांनी सामंजसपणे भूमिका घेत आम्ही बांधकाम करताना रितसर बांधकाम परवाना शुल्कसह बेटरमेंट शुल्क मिळून मनपाकडे अडीच कोटी रुपये भरलेले आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यावर भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले आहे.‌ स्थानिक रहिवाशांना रस्ते, पाणी, ड्रेनेज व्यवस्था करून त्या सुविधा मनपाकडे हस्तांतर केलेल्या आहेत.

मनपा नियमानुसार येथील रहिवाशांकडून निवासी व वाणिज्य कर जमा करते. त्यामुळे पुढील सुविधा देण्याचे काम मनपाचे आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने मनपा अभियंता अनिल तनपुरे यांना दुरध्वनीवर संपर्क करत तातडीने ड्रेनेजलाइन दुरूस्त करून द्या, यासाठी मनपाला काय सहकार्य लागेल ते मी स्वतः उपलब्ध करून द्यायला तयार आहे, असे म्हणत त्यांनी नागरिकांच्या वतीने तनपुरे यांना दुरध्वनीवर विनंती केली.

तनपुरे यांनी दोन दिवसात ड्रेनेजलाइन दुरूस्त करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बिल्डर पंजाबराव तौर यांनी नागरिकांसमक्ष तातडीने जेसीबी बोलाऊन धोकादायक होर्डींग्ज काढून घेत नागरिकांना दिलासा दिला. त्यानंतर येत्या आठ दिवसात खुल्या भुखंडाची स्वच्छता करून लेव्हल करून त्यावरील खड्डा बुजवण्याचे आश्वासन दिले. मात्र आठ दिवसांत समस्या न सुटल्यास रेणुकापुरम येथील रहिवाशांनी मनपा कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे.