Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : स्मार्ट सिटीच्या 'या' कामाबाबत जवाहर काॅलनीतील व्यापाऱ्यांचा का उडाला भडका?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत जवाहर काॅलनीतील त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा चौकातील रस्ता खोदल्याने ऐन गुढीपाडवा, रमजान ईद, आंबेडकर जयंती पाठोपाठ रामनवमी अशा मोठ्या सणोत्सवाच्या काळात रस्ता खोदून काम सुरू करण्यात आले. त्यात दोन्ही बाजुंना मातीचा ढिगारा टाकून रस्ता बंद करण्यात आल आहे. त्यामुळे जवाहर काॅलनीतील त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा परिसरातील व्यवसाय डबघाईला आले आहेत.

ग्राहकांना दुकानांपर्यंत येण्यास वाटच मिळत नसल्याने या भागातील व्यापारी आणि ग्राहकांनी महापालिकेच्या व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मनमानी कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

महापालिका व स्मार्ट सिटीच्या या अनागोंदी कारभाराचा टेंडरनामाने हा संपूर्ण परिसर पायी फिरत येथील नागरिक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत आकाशवाणी ते गजानन मंदिर रस्त्याचे काम काढून महानगरपालिकेने व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी व्यापाऱ्यांची दिवाळी कडू केली. आता पुन्हा तसेच घाईगडबडीत होत असलेल्या या ओल्या कामावर क्युरींग देखील योग्य पध्दतीने केली जात नाही. ओल्या कामावर दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता खुला करून दिल्याने रस्त्याला तडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुढी पाडवा, रमजान ईद, आंबेडकर जयंती पाठोपाठ रामनवमी उत्सव म्हणजे बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण येण्याचा काळ. परंतु, याच कालावधीत स्मार्ट सिटीच्या कामासाठी त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा चौकातील मुख्य रस्ता खोदण्यात आल्याने जवाहर काॅलनी, बालाजीनगर, उत्तमनगर, बौध्द नगर व आसपासच्या शेकडो वसाहतींना या परिसराकडे जाणारा मुख्य मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे येथे ग्राहक फिरकत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात व्यवसाय डबघाईस आले आहेत. येथे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम लवकर पूर्ण करून हा रस्ता ग्राहकांसाठी खुला करून द्यावा, अशी या व्यापाऱ्यांची मागणी आहे.

या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील व्यापाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. महानगरपालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे व या संथ कामामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल  व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे, अशी जरी आम्ही मागणी करत असलो तरी घाईगडबडीत केलेला रस्ता किती दिवस तग धरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.