sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : ठाकरे गटाच्या उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना पाण्यात का बसवले? नेमके काय झाले?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नऊ वर्षांपूर्वी सातारा - देवळाईला रस्ते, पथदिवे, पाणी, भूमिगत गटार योजना आणि इतर पायाभूत सुविधा देऊ, असे म्हणत या भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न दाखवत मनपात समावेश केला. मात्र आता सुविधा तर दूरच मनपाने या भागातील मालमत्ता गुंठेवारी कायद्यात अडकवून नफेखोरीचा इरादा स्पष्ट केला आहे. उन्हाळ्यात पाणी पाणी करणाऱ्या सातारा - देवळाईकरांना दर पावसाळ्यात चिखलाची दलदल सोसावी लागते.‌

विशेषतः देवळाईचौक ते साईटेकडी या रस्त्यासाठी शिंदे गटाचे पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी शासनाच्या नगररचना विभागाकडून ३५ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची नेमणूक करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर शहरातील जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला रस्त्याच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून जलवाहिनी टाकण्याचे काम, महावितरण व महानगरपालिकेचे विद्युत खांब हटविण्याबाबत कमालीची उदासीनता आणि नियोजन शून्य कारभाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले आहे.

त्यामुळे मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांंसह माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उप शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, उप विभाग प्रमुख दिनेश राजेभोसले, नितीन झरेकर पाटील, शिवाजी बचाटे, सुरेश कसबे, सदानंद पांडे, शरद जोशी, श्रीधर हिवाळे, सागर निकम, शिवाजी हिवाळे, भारत हिवाळे आदी संतप्त कार्यकर्त्यांनी जीव्हीपीआर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सब कंत्राटदार रेवा इंटरप्रायझेसच्या अधिकाऱ्यांना थेट खड्डेमय झालेल्या देवळाई रस्त्यात साचलेल्या पाण्यात अधिकाऱ्यांना बसवून ठेवत साहेब, तुम्हीच सांगा आता कसे वाटतेय, असा सवाल करत संताप व्यक्त केला. यात जीव्हीपीआरच्या व्यवस्थापक महेश दुसरे, बालाप्रसाद गुप्ता, तसेच पीएमसीचे व्ही.बी हाटकर, अविनाश साळुंके व सब कंत्राटदार रेवा इंटरप्रायझेसचे अमर मगर यांचा समावेश होता.

शहरातील महापालिका हद्दीतून जाणाऱ्या व छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, देवळाई, साईटेकडी, भिंदोन, गाडीवाट, कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५च्या मार्गावरील सोलापूर-धुळे ते साई टेकडी या जवळपास साडेतीन किलोमीटर रस्त्याचा नूर पालटला. मात्र बीड बायपास ते देवळाईगाव ते सोलापूर - धुळे हा एकूण साडेतीन किलोमीटरचा रस्ता महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेचा कंत्राटदार जीव्हीपीआर तसेच महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गत वर्षभरापासून रखडलेला आहे.

टेंडरनामाची वृत्तमालिका आणि ससतच्या पाठपुराव्याने पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी या रस्त्यासाठी निधी खेचून आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. दहा किलोमीटर दुरुस्तीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर, जे. पी. कन्स्ट्रक्शन, व्ही. पी. सेठ्ठी, पी. एस. बागडे आदी चार कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात सर्वांत कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले आहे.‌

दरम्यान या कंपनीला काम मिळताच टेंडरनामाने बीड बायपासच्या चुकीच्या आणि काम सुरू असतानाच रस्ता उखडल्याचे बिंग फोडले होते. आमदार शिरसाट यांनी कंत्राटदार जीएनआय कंपनीला देवळाई रस्त्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या रस्त्यावर कुठेही क्रॅश नाही, आरपार भेगा पडल्या नाहीत. सरफेस देखील खरबडला नाही. वाहन चालवताना चढ उतार जानवत नाही. पावसाचे पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला उतार दिल्याने रस्त्याचे आयुष्य देखील वाढणार आहे. याशिवाय जुने नळकांडे पूल तोडून नवे आयसीसी पूल बांधल्याने पावसाळ्यात लोकांचा मार्ग सुखकर झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रवाशांनी देखील स्तुती केली आहे.

शहरातील बीड बायपास देवळाई चौक ते देवळाई तसेच साईटेकडीपर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत होते. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, महाविद्यालये तसेच एमजीएम विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालये व राज्यस्तरीय सरपंच प्रशिक्षण केंद्र तसेच कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांसह पंचक्रोशीतील शेकडो गावकऱ्यांना खड्ड्यांमुळे व त्यात साचलेल्या डबक्यांमुळे माेठा त्रास सहन करावा लागत होता.

पावसाळ्यात तर खड्ड्यात पाणी भरल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागत होते. टेंडरनामाने या रस्त्याची झालेली खड्डेमय अवस्था आणि त्यामुळे लाखो वाहनचालकांना सोसावा लागणारा त्रास यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात या १० किमी रस्त्यासाठी १७  कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु, ठाकरे सरकार कोसळताच शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला ग्रहन लागले होते. परंतु, हा रस्ता तयार करावा, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार संजय शिरसाट यांनी सातत्याने पाठपुरावा करून शिंदे सरकारकडून  ३५ कोटी रुपये मंजूर केल्याने नागरिकांत आनंदोत्सव साजरा झाला होता. 

दरम्यान सोलापूर - धुळे महामार्ग ते साईटेकडी या रस्त्याचे रुंदीकरणासह व पूल व मोत्यांच्या बांधकामासह सिमेंट रस्त्याने पर्यटक, साईभक्त व ग्रामस्थांना भूरळ घातली आहे. मात्र सोलापूर - धुळे ते देवळाई गाव ते जुना बीडबायपास शहरी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर भविष्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच पुन्हा रस्त्याचे खोदकाम होऊ नये यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी या संपूर्ण रस्त्याचे नियोजन केले आहे. रस्त्याच्या कामात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम खोळंबले आहे.

तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे व महानगरपालिकेचे विद्युत खांब आडवे येत आहेत. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी शिरसाटांकडून गत वर्षभरापासून पत्रव्यवहार सुरू आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्यासमवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची अनेकदा बैठक देखील शिरसाट यांनी लावली होती. मात्र, अद्याप संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्याचे काम रखडल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.

सातारा - देवळाईकरांसाठी प्रमुख जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या देवळाई चौक ते साई टेकडी या रस्त्यावर मोठमोठे भगदाड पडल्याने पावसाळ्यात रस्त्याला नदी व तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे "रस्ता असून अडचण नसून खोळंबा" अशी म्हणण्याची वेळ येते.

सातारा - देवळाई परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौक ते म्हाडा कॉलनी ते देवळाई गावठाण रस्ता, रेणुकामाता मंदिर कमान ते धुळे - सोलापूर हायवे, धुळे - सोलापूर हायवे ते कांचनवाडी हा राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षांपूर्वी जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने पाइपलाइन टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. शहर भरातील खोदून ठेवलेल्या रस्त्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ५४ कोटीची तरतूद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही तरतूद देखील कागदावरच आहे.‌

छोट्यामोठ्या पाईप टाकण्यासाठी एक ते साडेतीनमीटर खोदकाम करताना जेसीबी आणि पोकलेनचा वापर केला जात आहे.‌ खोदकाम करून रस्त्यांवर महिनोन्महिने डोंगर उभे केले जात आहे. पावसात माती रस्त्यांवर पसरते आणि रस्ते चिखलमय होतात. यामुळे संपूर्ण रस्तेच वाहतुकीसाठी तकलादू बनतात. मात्र अधिकारी रस्त्यांच्या स्वच्छतेची देखील दखल घेत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

या रस्त्याचे महावितरण कंपनीने विद्युत रोहीत्रे, विजेचे खांब व महानगरपालिकेचे पथदिव्यांचे खांब हटविण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन व भूमिगत गटार योजनेचे काम देखील सुरू केले आहे. येत्या १५ दिवसात हे काम आटोपल्यावर सिमेंट रस्त्याचे काम सुरू होणार आहे. सातारा - देवळाईतील पाइपलाइन आणि भुमिगत गटार योजना कामात खराब झालेले रस्ते दुरुस्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सातारा - देवळाईत अडीचशे कोटीची भूमिगत गटार योजना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील लवकर सुटेल. नुकतीच या भागात दहा सिमेंट रस्त्याची कामे सुरू केली आहेत. यापूर्वी ५० कोटींचे रस्ते झाले आहेत. मी विकासाच्या कामात सातारा - देवळाईसाठी कुठेही कमी पडलो नाही.

- संजय शिरसाट, आमदार, शिवसेना (शिंदे गट)