Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : विभागीय आयुक्तांच्या दणक्यानंतर बोगस NA परवान्यांची माहिती कोणी दडवली?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महानगर विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१३ गावांत बोगस अकृषक परवान्यांच्या (NA) आधारे जमीन खरेदी - विक्रीचे अनेक व्यवहार झाल्याचे विभागीय आयुक्त तथा महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर आर्दड यांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

प्राधिकरणाच्या विनापरवाना कोणत्या नियमानुसार अकृषक परवाने (एनए) दिले गेले, याची गंभीरपणे आर्दड यांनी चौकशी सुरू केली आहे.‌ एनएचे परवाने दिलेल्या सर्व संचिका आर्दड यांनी संबंधित महसूल विभागांकडून मागविण्यात आल्या होत्या.‌ मात्र अर्धवट संचिका दिल्याचे लक्षात आल्यावर आर्दड यांचा पारा अधिक चढला आहे. त्यामुळे लालफितशाहीत संचिका दडवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होणार, याची प्रतीक्षा आहे.

महाविकास विकास प्राधिकरणांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, फुलंब्री, पैठण,आणि गंगापूर तालुक्यातील ३१३ गावांचा समावेश होतो. या गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी शासनाने महानगर विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. या प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून विभागीय आयुक्तांवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे.‌

छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास जमिनींचे भाव आकाशाला भीडले आहेत. यामुळे भूमाफियांचे आणि दलालांचे खिसे चांगलेच भरभक्कम होत आहेत. शेत जमिनींचे बनावट कागदपत्रे तयार करून जमिनींचे प्रभाग हातोहात बदलले जात आहेत. तत्कालीन  जिल्हाधिकाऱ्यांनी थेट हरित पट्ट्यांच्या आरक्षणात देखील अकृषक परवाने देण्यास भाग पाडले आहे.‌

या संदर्भात वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आर्दड यांनी गत शुक्रवारी आढावा बैठक घेतली होती. त्यात सन २०१९ ते २०२३ पर्यंत महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत कोणकोणत्या शेत जमिनींना अकृषक परवाने दिले आहेत. याची कठोर चौकशी त्यांनी सुरू केली आहे. त्यात प्राथमिक चौकशीत अनेक बोगस अकृषक परवाने दिल्याचे देखील उघड झाले आहे.‌

बोगस अकृषक परवाने बहाल केल्याने महानगर विकास प्राधिकरणाला पुढे शहराचा विस्तार करताना मूलभूत सोयीसुविधांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता बेजबाबदार अधिकाऱ्यांबद्दल आर्दड काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.